जगन्नाथचे लग्न 8
“राहूं देत. नको रडू. तुझ्या मित्राचे लग्न होणार त्या लग्नात विघ्न नको. आनंदात दु:ख नको. सुखांत अश्रु नकोत. देव करो व तुमचे प्रेम टिको. ख-या प्रेमाचा आदर्श जगात दिसो!”
गुणा वरती माडीवर गेला. ते सारे खादीचे कपडे जवळ घेऊन तो रडला. किती जगन्नाथचे माझ्यावर प्रेम, असे त्याच्या मनांत आले, परंतु याला जग मिंधेपण म्हणतें. माझे कर्तव्य काय? हे कपडे घेणे का पाप? ही आंगठी बोटांत घालणे का पाप? मी आंगठी दिली नेऊन, दिले कपडे परत नेऊन, तर जगन्नाथ रडेल. लग्नांत तो हसणार नाही. जन्मभर त्याला रुखरुख राहील. हे प्रसंग का नेहमी येतात? आयुष्यांत एकदा येणारा मंगल प्रसंग. त्या वेळेस का मित्राला रडवू, त्याला दु:खी करू? त्याने ते कपडे हृदयाशी धरले. जणु मित्राचे निर्मळ प्रेम, मित्राचा प्रेमळ विशुद्ध आत्माच तो हृदयाशी धरीत होता. त्यावर प्रेमाश्रूंचा अभिषेक करीत होता.
त्याच्या भावना उचंबळल्या होत्या. कोमल, प्रेमळ भावना. प्रेमाच्या भावना सर्व जीवनाला अंतर्बाह्य वेढून टाकतात. त्यांची शक्ति अपार असते. रोमरोमाला त्या व्यापून असतात. गुणा सद्गदित होऊन उठला. त्याने हाती सारंगी घेतली. तो तारा छेडू लागला. कंपायमान हृदय तारांच्या कंपाने बोलू लागले. अतिमधुर व कोमल असे राग त्याने आळविले.
तो प्रेमाच्या स्वर्गात होता. भूतलावर तो नव्हता. सभोवती प्रेमाचा बाग बहरला आहे, वसंत फुलला आहे, कारंजी थुईथुई उडत आहेत, कमळे फुलली आहेत, पाखरे गोड आवाज काढीत आहेत, सारे सुंदर आहे, सुंदर आहे असे जणु त्याला वाटत होते. डोळे मिटून तो वाजवीत होता. हृदयांत डोकावून वाजवीत होता.
भावना ओसरली. हृदयावरचा भार कमी झाला. त्याने हळूच नेत्रकमले उघडली. तो समोर जगन्नाथ दिसला. दोघे एकमेकांकडेपहात राहिले. दोघांनी डोळे मिटले. दोघांनी पुन्हा उघडले. दोघांचे डोळे भरून आले.
“तू येऊन हळूच बसलास.”
देवासमोर बसलो. प्रेममय देव.”
“जगन्नाथ, माझ्यावर तुझे खरोखर प्रेम आहे?”
“तुला आज का बरे शंका आली? ती शंका येऊन का रडत होतास? परंतु छे, मनांत अशी शंका असती तर असे अपूर्व संगीत तुझ्या बोटांतून निघते ना. हृदयातील सारी कोमलता तू ओतीत होतास. तुझे मन प्रेमाने भरून गेले होते. तुझा चेहरा मी पाहत होतो. किती स्निग्ध व सुंदर दिसत होता!”