आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 5
“गुणा आला म्हणजे तूंच खालून घेऊन ये. वहिनीजवळ माग, मी नसलें तर.”
“तूं कुठें जातेस?”
“जातें जरा बसायला कुठें तरी—”
आई गेली. जगन्नाथ आपल्या अंथरुणावर पडून होता. खरेंच का माझें लग्न करणार? एव्हांपासून लग्न! नाहीं केलें तर? मीं हट्ट धरला तर? आई, बाबा रागावतील, रडतील. काय करावें? कोठें निघून गेलों तर? कोठें जावें निघून? दयाराम म्हणत हिंदुस्थानांतील आश्रम पाहून ये. ठिकठिकाणीं ग्रामसेवेचीं कामें चाललीं आहेत तीं पाहून ये. नवीन संघटना पाहून ये. जाऊं का हिंदुस्थानभर हिंडायला? दक्षिण हिंदुस्थानांत जाऊं का? दाक्षिणात्य संगीतहि शिकावें. त्या संगीताची माहिती करून घ्यावी. यावें हिंडून. हिंदुस्थान पाहून. अनुभव घेऊन. जीवन समृद्ध करून. अशा विचारतंद्रींत जगन्नाथ होता.
आणि गुणा हळूच येऊन बसला होता. जगन्नाथ पाठमोरा होता. त्याला कळलेंहि नाहीं. तो जेव्हां कुशीवर वळला तेव्हां त्याला गुणा दिसला.
“हें रे काय गुणा? बोललासहि नाहीं.”
“म्हटलं तुझी समाधि कशाला भंगावी!”
“खरेंच मी समाधींत होतों.”
“कोणते विचार चालले होते?”
“गोड गोड विचार.”
“मलाहि कळूं दे.”
“हा जगन्नाथ हिंदुस्थानभर हिंडायला जाणार आहे.”
“एकटाच कीं दोघं?”
“दोघं कोण?”
“अरे तुझें आतां लवकरच लग्न आहे.”
“कांहींतरीच.”
“सारा गांव बोलत आहे. सोनारांकडे नवीन दागिने घडत आहेत.”
“गुणा, काय करावें?”
“लग्नाला उभें रहावें.”
“माझ्या मनांत येतें कीं हें लग्न टाळावें. घरांतून पळून जावें. हिंदुस्थानभर हिंडावें. दक्षिणेकडे जावें. तिकडचें संगीत शिकावें. यावें सात आठ वर्षांनीं घरीं परत.”
“परंतु लग्न लाव व मग जा निघून.”