येथें नको, दूर जाऊं 11
“गुणा, उभा का? मग बस. आज आमच्याकडेच जेव.”
“नको, जातो. आई वाट पाहील. जाऊं?”
“सकाळी ये हो लौकर.”
गुणा बोलला नाही. जिन्यांतून तो उतरला. दरवाजापर्यंत जगन्नाथ आला.
“जाऊं?”
“आज असे कां विचारतोस? कोठे जाणार आहेस?”
“कोठे म्हणजे घरी. अजून घर आहे.”
“ते कायमचे राहील.”
“तुझे हृदयमंदिर तर कायमचें आहेच. ते माझे खरे घर. ते कोणी विकणार नाही, विकत घेणार नाही. अभंग चिरसुंदर प्रेमममंदिर.”
“माझे हृदय, माझे मन, म्हणजे तुझे मानससरोवर. येथे तुझा जीवहंस येऊ दे सदैव पंख फडफडवीत. तेथे प्रेमकमळांचा चारा मिळेल, प्रेममकरंद चाखायला मिळेल हो गुणा.”
“तुझ्याकडे आज सारखे पहात रहावेसे वाटते.”
“आणि मी कोणते चरण गुणगुणत असतो आहे माहीत?”
“कोणते रे?”
“मधु-मधुर गुणाची मूर्ति डोळ्यांसमोर
हृदय मुदित जेवी मेघ पाहून मोर।।”
हृदय मम सुखावे अंबुदें जेवि मोर
हृदय मुदित नाचे अंबुदें जेवि मोर