ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 5
“जगन्नाथ, आम्हांला सोडून कां जाऊं म्हणतोस ? तूं का आम्हां सर्वांना कंटाळलास ? इंदिराताई रात्रंदिवस रडत आहे. हातांनी सूत काढते. डोळ्यांतून टिपे काढते. मुखानें देवाचे नाम. तुझ्यासाठी ती सती प्राण कंठी धरून आहे. तुझे आईबाप सारखी वाट पहात आहेत. जगन्नाथ, चला राजा. माझा पांडुरंग मला भेटला. माझे दैवत मला भेटलें. माझी यात्रा कृतार्थ झाली. तुला शोधायला मी निघालों होतों. मला शोधून तूं कंटाळलास व निराश झालास, होय ना ? चल परत. आपण खूप काम करूं, क्रांतीचा झेंडा हाती घेऊं. शेतक-यांचे संसार, त्या भोळ्या भाबड्या श्रमजीवींचे संसार सुखी करूं. त्यांना विठ्ठलाचे झुंजार वीर करूं. क्रांतीचे वीर. चल. या चंद्रभागेंत निराशा सोड आणि चल.”
“गुणा, या चंद्रभागेत मी काय काय तरी सोडलें तुला आहे का माहीत ? ते सांगेन तर तूंहि मला चंद्रभागेंत जायला परवानगी देशील. तूं आफल्या हातानें मला लोटशील. माझ्यासारख्याच तुला स्पर्श झाला म्हणून तुला वाईट वाटेल. गुणा, हा जगन्नाथ दोषी आहे, अनंत पापांचा स्वामी आहे. सांगूं तुला सारे, सारे सांगूं ?”
“सांग. तुझा हृदयसिंधू रिकामा कर.”
आणि जगन्नाथनें सारा इतिहास सांगितला. रोमांचकारी इतिहास. शेवटीं जगन्नाथला बोलवेना. तो भावनावेग आवरून म्हणाला, “गुणा, ती पहा कावेरी, तो बघ प्रेमा. जाऊं दे हो मला. आतां मरण्यांतच राम आहे. कृतार्थता आहे. जगण्यांत अर्थ नाही. मी खरोखरच भिकारी झालो. आत्मा गमावून बसलेला भिकारी. पावित्र्य व चारित्र्य यांची संपत्ति गमावून बसलेला भिकारी. शेतक-यांच्या शेती मी परत करीन. परंतु माझी निर्मळतेची, निष्पापतेची शेती, पावित्र्याची, चारित्र्याची शेती गेली हो कायमची वाहून. ती कोण परत देणार ? मी कायमचा दिवाळखोर बनलो. सोन्यासारख्या मानवी शरिरांत येऊन शेणाचे दिवे लावले. अरेरे ! गुणा, जाऊं दे मला. तूंच तुझ्या कोमल मधुर हातांनी लोट. सारंगी वाजवणा-या हातांनी माझ्या जीवनाचे भेसुर संगीत कायमचे संपवून टाक. उठ, लोट मला.”
“मी इंदिरेच्या पायांवर तुला लोटीन. चल. तिच्या डोळ्यांतील चंद्रभागेंत तुला लोटीन. ती तुला पवित्र करील. ती तुझी पावित्र्याची शेती परत देईल. पुन्हां फुलवील. दुप्पट जोरानें फुलवील. चल. जगन्नाथ चल, नको अंत पाहूं.”
“गुणा, इंदिरेला हें काळें तोंड कसें दाखवूं ? हा वंचना करणारा हात तिच्या हातांत पुन्हां कसा देऊं ?”
“जगन्नाथ चल हो. तुझे ते जीवन विसरण्याइतकें जर आमचे प्रेम मोठे नसेल तर त्या प्रेमात काय अर्थ ? तेच जावन विसरण्याइतकें जर आमचे प्रेम जें कोटी अपराधहि पोटांत घालते. सतीच्या डोळ्यांतील एक अश्रु पापांचे पर्वत विरघळवून टाकायला समर्थ आहे. एक पावित्र्याचा स्फुल्लिंग पापाचा खंडोगणती केरकचरा जाळून टाकायला पुरे आहे. चल, राजा चल. इंदिरेसाठी चल.”