जगन्नाथचे लग्न 4
“मी का नवरदेव आहे?”
“नवरदेवाचा मित्र आहेस. नवरदेवाचा आनंद आहेस.”
गुणाला जगन्नाथची इच्छा मोडवत नसे. प्रेमाची इच्छा खरेच मोडवत नाही. त्याला फार कठीण मन करावे लागते. गुणाला कठोर होता येत नसे. त्याला नाही म्हणता येत नसे. नाही म्हणण्याचे धैर्य त्याच्याजवळ नव्हते.
एके दिवशी गुणा व जगन्नाथ जळगावला गेले. खादीभांडारांत गेले. नानाप्रकारचा माल पाहू लागले. रेशमी शर्टिगसुद्धा तेथे होते. दोघांनी रेशमी शर्टिंग घेतले. कोटासाठी स्वच्छ पांढरे कापड घेतले. आणि धोतरजोडा. तेथे १९ रुपयांचा एक बारीक तलम धोतरजोडा होता.
“जगन्नाथ, हा घे तुला.”
“आणि तुला?”
“मला इतका महाग कशाला हवा!”
“माझ्यासारखें तुला. कोणी तुला हसायला नको.”
“तुझे काही तरी म्हणणे.”
इतक्यांत व्यवस्थापकांनी आणखी एक बारीक धोतरजोडा दाखविला.
“छान आहे हाहि.” गुणा म्हणाला.
“याची किंमत?” जगन्नाथने विचारले.
“त्याच्यावर मांडलेली आहेच. १३।। रुपये.”