गुणा कोठें गेला गुणा? 6
अशी चालली होती बोलणी. परंतु जगन्नाथ बोलला नाही. “जाऊ दे दोन घास. त्याला नका चिडवू.” आई म्हणाली. परंतु जगन्नाथ उठून गेला. पटकन् हाततोंड धुऊन वर गेला. खोली लावून आंथरुणावर पडला. गुणाच्या शतस्मृतींनी तो ओथंबून गेला होता. त्या गादीवर गुणा निजलेला होता. त्या उशीवर गुणाने डोके ठेवलेले होते. पुन्हा गुणा कधी येईल? कधी देईन त्याला स्वच्छ असे हे आंथरूण? कधी त्याच्यासाठी गादी घालीन, वर स्वच्छ चादर घालीन, उशाला सुंदर उशी देईन? कधी मी त्याची अशी प्रेमपूजा करीन? कोठे गेला गुणा? तो काय खाईल, कोठे झोपेल, काय पांघरील, काय आंथरील? परंतु तो असेल का, जिवंत असेल का? हो असेल. नाही तर मी जिवंत राहिलो नसतो. माझे प्राणहि उडून जाते.
इतक्यात त्याच्या नावाने पोस्टमनने हाक मारली. तो उठला. त्याच्या नावाने क्वचितच कधी पत्र येत असे. धावतच तो खाली गेला. पत्र दादाच्या हातात होते. दादा फोडणार होता. झडप घालून ते जगन्नाथने घेतले. दादाकडे कठोर दृष्टीने त्याने पाहिले. जगन्नाथने हस्ताक्षर ओळखले. ते चिरपरिचित अक्षर होते. गोड गोड अक्षर होते. त्या अक्षरांतच मेळ्याचे संवाद लिहिलेले होते. गुणाची बोटेच—तीं कलावंत बोटेच असे मोत्यासारखे लिहीत असत.
ते पत्र घेऊन जगन्नाथ आपल्या खोलीत गेला. ते पत्र गुणाचे होते. आणखी कुणाचे नव्हते. कुणाचे असणार? परंतु पत्रांत काय असेल? सुखरूप असेल का गुणा? की दुसरे काही असेल? कोठे गेला ते असेल का? त्याला घेऊन येईन परत? परंतु दूर दूर फार दूर गेला असेल तर, जगापासून दूर गेला असेल तर? मग का मीहि जगापासून दूर जाऊ? आणि आई बाबा? आणि मी आता एकटा नाही. दुस-याहि एका जिवाचे सुखदु:ख माझ्याशी बांधले गेले आहे. डोक्यावर शिरपूरचीहि जबाबदारी आहे.
जगन्नाथने पाकिट फोडले. आत सुंदर पत्र होते. गुणाचे पत्र. प्रेमाने थबथबलेले पत्र. भावनांनी रंगलेले पत्र. ते पत्र नव्हते. ते हृदय होते स्नेहमय उदार हृदय. पितृभक्ती व मित्रप्रेम यांच्या झगड्यांत तडफडणारे दु:खी हृदय.
“जगन्नाथ, मी कुठेहि असलो तरी तुला स्मरेन. तू माझ्याजवळ आंत बाहेर आहेस. तुझा रेशमी सदरा माझ्याजवळ आहे. तो अंगात घालीन. वाटेल की तू जवळ आहेस. जीवन वेढून राहिला आहेस. बाबांचे म्हणणे अज्ञातवासांत रहावे. मी कबूल केले आहे; परंतु या अज्ञातवासांतहि तुझ्या प्रेमाचा सुवास भरून राहील. तू दु:ख करू नको. तू मला शोधू नको. एके दिवशी आपण पुन्हा सारे भेटू. पुन्हा पद्मालयाच्या तळ्यात पोहू. जंगलात फिरू. मोरांची पिसे गोळा करू. एकमेकांच्या कानांत ती अडकवू. येईन, पुन्हा येईन. वेळ येईल तेव्हा. आई बाबा सांगतील तेव्हा. ईश्वराची इच्छा असेल तेव्हा. परंतु पुन्हा भेटू व परस्पर अपार प्रेम लुटू. कदाचित् या वियोगाने आपण अधिकच जवळ येऊ. अधिकच परस्परांचे होऊ. अधिकच परस्परांचे जीवनांत मुरु. भरुन उरू हो गड्या!
रडूं नको
रुसूं नको
हंस रे माझ्या गड्या
आपण मोठे होऊं तेव्हा भेटूं. मग पुष्कळ काम करू. तूहि तेव्हा मोठा झालेला असशील. स्वतंत्र असशील. तुझे पंख मग कोण छाटणार नाही. तू उड्डाण करू शकशील. तू तुझी संपत्ति येवेत ओत. मी माझे जीवन ओतीन. दयाराम भारती माझ्या मनांत आहेत. तू आहेस; व गरीब जनताहि मनांत आहे.