शेवटी सारे गोड होतें 3
“बघूं, काढतें.” असे म्हणून इंदिरा पुन्हा सूत काढूं लागली. नीट येऊ लागले. सुरेख सुंदर सूत.
“तू माझे सूत सांधलेंस. तुटण्याचे थांबवलेंस.”
“आणि माझा गुणाहि तुमची ताटातूट थांबवील. तुमची जीवनें पुन्हा सांधतील. गंगायमुना एकत्र येतील.”
“कधी येतील, कधी येतील?”
“येतील लौकरच येतील. सूत तुटायचे थांबले. ते लौकरच येतील.”
जगन्नाथची आई वर आली.
“मुलींनो, पडा हो आतां. नका चिंता करूं. येतील हो दोघे. तुम्हां दोघींना सुखी पाहून मगच मी डोळे मिटीन.”
“आई, झोप येते कोठे? बसलो आहोत बोलत. थोड्या वेळाने पडूं.” इंदु म्हणाली.
“आई, सूत आता तुटत नाही. इंदूने जादू केली.”
“गुणाहि अशीच जादू करील. ताटातूट दूर करील.” म्हातारी आतां खाली गेली. रात्र बरीच झाली होती.
एरंडोल रोड स्टेशनवर गाडी नवाला आली. दोघे मित्र खाली उतरले. त्यांच्याजवळ सामान फारसे नव्हते.
“गुणा, आपण चालत जाऊं. शेकडो गोष्टी बोलत जाऊं. सहा वर्षांचे बोलून घेऊं. सहा वर्षींतील रामायण तुला सांगेन. अरण्यकांड सांगेन, सुंदरकांड सांगेन.”
“आणि मीहि माझे भारत भागवत तुला सांगेन.” गुणा म्हणाला.
“मग जायचे ना चालतच? चल.” जगन्नाथ म्हणाला.
“पण जगन्नाथ, तू गळून ना गेला आहेस?” गुणाने प्रेमाने विचारले.
“अरे, हिंडण्याची या पायांना सवय आहे. आणि आतां उत्साह वाटत आहे. एरंडोलचा वारा अंगाला लागला, मनाला हुरूप आला. चांदणे आहे.”
“हे पावसाळी चांदणे. क्षणांत चांदणें, क्षणांत अंधार.”