गुणा कोठें गेला गुणा? 4
“जा भुरी फांसून पद्मालयाला राहायला.”
“दादा, काय केलेस हे?”
“अरे मी नव्हतो करणार. आपण का एकच सावकार आहोत? दुस-यांनी फिर्यादी केल्या. हुकुमनामा झाला. घरदार, शेतीवाडी सा-याचा लिलांव होईल. आणेवारीप्रमाणे प्रत्येक सावकाराला भाग मिळेल. आपण काय करायचें?”
“दादा, तो वाडा आपणच लिलावांत घेऊ व गुणा परत आला की त्याला तो देऊ. गुणा परत येईल. केव्हा तरी येईल. जगन्नाथपासून दूर राहून तो कसा जगेल? हा वाडा त्याचा आहे. जसाच्या तसा ठेवू.”
“वाडा म्हणे विकत घेऊ लिलावांत, आणि त्यांना देऊ! आणखी नको का काही द्यायला?”
“आणखी नको.”
जगन्नाथ घराबाहेर पडला. गुणाच्या घराजवळ आला. तो घराला कुलूप! अरेरे! तो तेथे घुटमळत होता. गुणा बाहेर येईल, त्याच्या माडीत जाऊ, तो सारंगी वाजवील असे त्याला वाटत होते. परंतु तेथील संगीत थांबले. जगन्नाथला रडू आले. त्या वाड्याच्या पायरीवर तो बसला. जणुं देवाच्या दारी बसला. देवाच्या बंद दारी.
पद्मालयाला तर नसेल ना गेला गुणा? आईबापहि घेऊन गेला असेल. परंतु मजजवळ बोलला असता वनभोजनाला जाता तर. का त्याच्या आईबापांचा काही नवस वगैरे होता? पाहून येऊ. त्याने सायकल घेतली. निघाला. रस्ता चांगला नव्हता. परंतु फिकीर नव्हती. वरून ऊन तापवीत होते. आंतून मित्राच्या वियोगाचा वणवा जाळीत होता.जगन्नाथ उन्हातून पद्मालयाला गेला. त्याचे तोंड लाल झाले. पद्मालयाला कोणी नव्हते. समोरचे तळे शांत होते. लाल कमळे फुललेली होती. त्यांचे मुके कळे पाण्यावर येऊन हात जोडून सूर्यनारायणाला प्रार्थीत होते. तो तेथे मुकपणे बसला. त्या तळ्याचे काठी बसला. त्या तळ्यांत तो व गुणा कितीदा तरी पोहले होते. पाण्यांत बुडून एकमेकांना शिवण्याचा खेळ खेळले होते. एकदा एक कमळ तोडून आणून आपणते गुणाला कसे दिले होते ते त्याला आठवले. परंतु आज घामाघूम झालेला होता तरी त्या तळ्यात तो जाऊ इच्छित नव्हता. ते पाणी आज त्याला शीतळ वाटले नसते. त्या पाण्याने अंग पोळले असते; जळले असते. तो उठला. जवळच्या जंगलात शिरला. गुणा, गुणा अशा हाका मारू लागला. मोरांनी केकारवाने उत्तर दिले. परंतु किती वेळ असा भटकणार?
पुन्हा सायकलवरून तो घरी आला.
आपल्या खोलीत रडत बसला. काय करायची ही संपत्ती?
आग लागो तया सुखा
जेणे विठ्ठल नये मुखा
मज होत कां विपत्ति
पांडुरंग राहो चित्तीं