येथें नको, दूर जाऊं 5
जगन्नाथला त्याप्रमाणे सांगण्यात आले. परंतु वास्तविक तसे नव्हते. जगन्नाथ विश्वास ठेवून होता. गुणा व तो शाळेत जात होते. एकत्र खेळत होते. बोलत होते. परंतु ही बोलणी, ही हसणी लौकर खलास होणार आहेत, ही त्यांना कल्पनाहि नव्हती. आंबे मोहरलेले असावे, परंतु अकाली गारांची वृष्टी व्हावी, आंबे झडून जावे, त्याप्रमाणे एखादे वेळेस मानवी मनाचे होते.
रामरावांनी एरंडोल सोडून जाण्याचे ठरविले. आज ना उद्या हे घर जाणार, जप्ती येणार, लिलाव होणार हे ठरल्यासारखेंच झाले होते. त्या गोष्टी स्वच्छ दिसत होत्या. गुणाजवळ बोलायला त्यांना अद्याप धीर होता नव्हता. परंतु एके दिवशी ते त्याच्याजवळ बोलले.
“बाबा, आपण कोठे जाणार?”
“जाऊ, पृथ्वीच्या पाठीवर केठेहि राहू.”
“राहायचे कोठे?”
“राहूं कोठे तरी. तू म्हणाला होतास ना एकदा की मी सारंगी वाजवीन व भिक्षा मागून आणून श्रावणाने आईबापांना खांद्यावरून हिंडविले त्याप्रमाणे एखाद्या मोठ्या शहरांत लहान खोली घेऊन. तू जात जा सारंगी वाजवीत, मिळेल भिक्षा ती आणीत जा.”
“बाबा, काय सांगू मी? मी लहान आहे.”
“लहान नाहीस. आता तू मोठा आहेस. आमचा अन्नदाता आता तू आमचा पालनकर्ता तू. तुला सारंगी दिली आहे. ती तुझे साधन. तूच आमची आशा. आमचा आधार. तूंच आमची अब्रू, आमची प्रतिष्ठा.”
“बाबा, तुम्ही सांगाल तेथे मी येईन. तुमच्याबरोबर रहाण्यांत माझा स्वर्ग आहे. मी तुम्हांला सुखवीन, हसवीन. जर सारंगी वाजवून मला भिक्षा मिळाली तर मी गोळा करून आणीन. येथे राहणे जिवावर येत असेल तर चला आपण दूर जाऊ. ओळखीच्या लोकांपासून दूर.”
“जाऊं, लौकरच जाऊं.”
रामरावांच्या घरावर जप्ती येणार असे गावांत लोक म्हणूं लागले. जगन्नाथच्या कानावर कुणकुण आली. एके दिवशी रात्री त्याला झोप येईना. काय करावे? एकाएकी त्याने निश्चय केला. समोरच्या खिडकीतून चंद्र दिसत होता. जणुं आपल्या मित्राचा मुखचंद्रच दिसत आहे असे त्याला वाटले. तो खिडकीतून पाहूं लागला. अत्यंत शांत, निस्तब्ध असा तो चंद्र होता. उद्यापासून उपवास करायचे त्याने ठरविलें. त्याला आनंद झाला. मित्रप्रेमाची परीक्षा तो देणार होता.