मित्रांची जोडी 12
“ मी जातों जगन्नाथ.”
“थांब रे, चल माझ्या खोलींत.”
इतर मंडळी खालीं गेली. दोघे मित्र खोलींत गेले. गुणानें जगन्नाथच्या गालांवरून हात फिरवले. त्याला रडूं आलें.
“माझ्यामुळें हें सारें. तुझे गाल, फुलासारखे गाल, त्यांचेवर मार. मागें आपण पन्हाळ्याला जात होतों. एक फुलपांखरूं येऊन तुझ्या गालावर बसलें होतें. आठवतें? तूं झाडाखालीं डोळे मिटून पडला होतास. मी शेजारीं वाजवीत होतों; आणि ते फुलपांखरूं तुझ्या गालांवर. जणुं फूलच आहे असें त्याला वाटलें, नाही? आणि त्या गालंवर मार! दुष्ट आहे तुझा दादा. जगन्नाथ, तूं असें नको करीत जाऊं. आपली मैत्री मनांत असूं दे. मी आतां जातों. हें सारें येथेंच राहूं दे. घरीं आई व बाबा यांना वाईट वाटेल. म्हणतील, आपला मुलगा आशाळभूत आहे. म्हणतील, याला स्वाभिमान नाहीं. मी ऐटीचा, दागिन्यांचा लोभी आहें, असें त्यांना वाटेल व असे स्वत:ला देतां येत नाहींत म्हणून त्यांना मेल्यासारखें होईल. इतर लोकहि हंसतील. म्हणतील उसनी ऐट.”
“गुणा, मी तुझ्याबरोबर येतों. मी तुझ्या आईला सांगेन. आज आपण संध्याकाळीं बरोबर जाऊं शिलंगणास. दोघे सारखे दिसूं. तूं हें सारं काढणार असशील तर घरांतून मी बाहेर पडणार नाहीं बघ.”
गुणाचें मित्रापुढें फारसें चालत नसे. जगन्नाथ मित्राला पोंचवायला निघाला. गुणाची आई वाट पहात होती. वाटेंत जाणारे येणारे गुणाकडे बघत. शाळेंतलीं मुलें हंसत. गुणाचे घर आलें. रामराव घरीं नव्हते.
“गुणा, हें रे काय? कोठून आलास नटून?” आईनें विचारलें.
“मित्राच्या घरून; मित्राच्या हातांनी.” तो म्हणाला.
“आई, आम्ही दोघांनीं आज सारखा पोषाख करायचा, सारखे दागिने घालायचे असें ठरविलें. आणि कोण चांगला दिसतो तें तुम्हांला विचारायला आलों. आई, कोण दिसतो अधिक चांगला?”
“तूंच दिसतोस हो जगन्नाथ.”
“गुणा नाहीं दिसत? मला तर गुणा अधिक चांगला दिसतो. तुम्ही कोणी खरें सांगत नाहीं. मोठीं माणसें खोटीं.”
“जगन्नाथ, गुणाच्या अंगावर दागिने नसते तर तो अधिक चांगला दिसला असता. जो तो आपल्या ख-या परिस्थितींत शोभतो. मोराच्या दोन पिसांनीं कावळा का सुंदर दिसेल? उलट अधिकच बावळट दिसेल. नाहीं?”