एरंडोलला घरीं 1
रामराव, त्यांची पत्नी आतां इंदूच्याच घरी राहात. इंदु अद्याप दु:खी कष्टीच होती. गुणा दर आठवड्यांस तिला पत्र पाठवी. पत्राची ती वाट पाहत असे. ते तिचे टॉनिक होते. दु:खाला विसरवणारे ते औषध. गुणाचे पत्र म्हणजे गुणकारी अमृत.
“आई, आपण येथून सारीं तुमच्या एरंडोलला जाऊं.” इंदु म्हणाली.
“का बाळ?”
“येथे नको. येथे मला सारखी आईची व बाबांची आठवण येते. येथे नको. हे घर नको. दूर दूर जाऊ. तुमच्या एरंडोलला जाऊं.”
“गुणा आला म्हणजे ठरवा काय ते. परंतु हे मोठे शहर आहे. येथे धंदा चालेल. ओळखीहि आहेत.”
“धंदा थोडाच गुणाला करायचा आहे? त्याला तर मोठे आरोग्यधाम काढायचे आहे.”
“आरोग्यधामाला पैसे लागतात इंदु.”
“हे घर आपण विकून टाकूं. बाबा असतांनाच एक शेटजी मागत होता.”
“पाहू पुढे. गुणा येऊ दे. आजच कशाला त्याचा विचार?” गुणाला यावयास आतां फार दिवस नव्हते. लौकरच तो येणार होता. इंदु त्याच्या येण्याची वाट पाहत होती. ती एखादे वेळेस “आतां येणार लौकर गुणा माझ्या घरीं.” असे म्हणून टाळ्या वाजवी. परंतु एकदम आईची व बाबांची आठवण येऊन ती कावरीबावरी होई.
सरतेशेवटी गुणा आला. निसर्गोपचार पद्धति शिकून आला. सर्वांना आनंद झाला. परंतु गुणाच्या मनांत दु:ख होते. एके दिवशी तो एकटाच बसला होता. तो खिन्न होता. इंदु जवळ उभी होती तरी त्याला कळले नाही.
“गुणा!”
“कोण, इंदु?”
“असे खोटे हसू नकोस. किती खिन्न होतास तूं? काय रे आहे दु:ख?”
“जगन्नाथची आठवण आली. त्याची पत्नी रडत असेल. त्याचे आईबाप रडत असतील. तो माझ्या शोधासाठी म्हणून बाहेर पडला. त्याला शोधायला मी नको का जायला?”
“कुठे जाणार तूं गुणा? उगीच का भटकायचे?”