येथें नको, दूर जाऊं 14
गावाबाहेर गाडी आली. रामराव, त्यांची पत्नी व गुणा तिघांनी गावाला मातृभूमीला प्रणाम केला. साश्रु प्रणाम केला. तिघे गाडीत बसली. गाडी निघाली.
गाडीत कोणी बोलत नव्हते.
त्यांच्या मनांतील विचार, भावना, कोण जाणू शकेल? गुणा गावांकडे तोंड करून बसला होता. त्याला का त्या बाजूला जगन्नाथ दिसत होता?
थोड्या वेळाने त्याने रामरावांस पुन्हा विचारले.
“बाबा, खरेच आपण कोठे जाणार?”
“जाऊ, दूर दूर जाऊ. येथे नको आता. दूर दूर.”
“दूर दूर म्हणजे कोठे?”
“देव नेईल तेथे. मी दुसरे काही ठरविले नाही. दूर जायचे. कोठे ते मलाहि माहीत नाही. ते देवाला माहीत असेल. तो बुद्धि देईल तेथे जाऊ. दूर दूर जाऊ. येथे नको.”