जगन्नाथ 21
“परंतु अलग अलग ठेवतील.”
“परंतु तुरुंग तर एकच असेल.”
“चल जाऊ दोघं.”
दोघे जणे निघून गेली. त्या सत्याग्रहांत सामील झाली. सरकार सत्याग्रहींना पकडीत होते. कावेरी व जगन्नाथ दोघांना अटक झाली. त्यांना शिक्षा झाली. कावेरीला दोन महिने शिक्षा झाली. जगन्नाथला चार महिने.
जगन्नाथ तुरुंगात होता. तुरुंग म्हणजे मानाची जागा, पूर्वीचे जीवन व भावी जीवन यांच्या विचारांची जागा. आपण दक्षिणेत कशाला आलो, ध्येय काय, उद्देश काय, कोठे वहावत चाललो, इंदिरा रडत असेल, म्हातारे आईबाप रडत असतील, दयाराम भारती काय म्हणतील? मी घरी पत्र पाठवले नाही. इंदिरेला पाठवले नाही. मी कावेरीच्या प्रेमांत अडकलो आणि हे असे चोरटे प्रेम! आम्हांला उजळ माथ्याने येईल का राहतां? होऊ का आम्ही भिकारी? भिकारी होऊन फिरावे असे का मला वाटते? मला कर्माचा कंटाळा आहे का? जबाबदारी घ्यायला मी कचरत आहे का? क्रांतीचे काम आपल्या हातून होणार नाही म्हणून का मी भिकारी होऊं पहातों? काही तरी काव्यमय करावेसे वाटते. कादंब-यांतून, कवितांतून वाटले तसे काही तरी करावेसे वाटते. काय आहे हे सारे? जसा सोडलापतंग. जात आहे कोठे तरी. ना दिशा ना ध्येय!
जगन्नाथला वाईट वाटे. एके दिवशी त्याने वर्ध्याच्या आश्रमाच्या व्यवस्थापकांस पत्र लिहिले, “मी तुरुंगात आहे. इंदिरेला कळवू नका. परंतु तिची खुशाली मला कळवा.” परंतु उत्तर आले की आश्रम बंद आहे. त्या एरंडोलला गेल्या. त्यानंतर त्याने एरंडोलला पत्र पाठवले. उत्तर आले की इंदिरा माहेरी आहे. तुरुंगातून त्याला आणखी पत्र मिळण्याचा अधिकार नव्हता. तो वाट पहात बसला सुटण्याची.
कावेरी आधी सुटली. सुटल्यावर तिने जगन्नाथची भेट घेतली. जगन्नाथ भेटू इच्छित नव्हता. परंतु आयत्या वेळी तो भेटायला निघाला. कावेरीला भेटला. तिने त्याचा हात हातांत घेतला.
“तुम्ही तुरुंगांत आहांत.”
“येईन लौकर बाहेर.”
“सत्याग्रह बंद झाला आहे. नाही तर मी पुन्हा केला असता.”