इंदु 3
“तुम्ही गुणाला नेणार असाल होय ना? परंतु गुणाला मी काल सायंकाळी दिल्या होत्या. त्याला तर आधी. त्या तुम्हीच खा. खा. नाहीतर मी शिकायला बसणार नाही.”
इतक्यांत ती दुसरी मुलगी आली. रामरावांनी एक वडी त्या मुलीला दिली व एक स्वत: खाल्ली.
गुणाला अलीकडे वेळ होत नसे. तो पहाटे उठे. अभ्यास करू लागे. आठ वाजले म्हणजे विश्वासरावांच्या घरी जाई. तेथे सारा श्रीमंती प्रकार. विश्वासरावांचे मेव्हणे गुणवंतराय म्हणजे सूर्यवंशी. उशिरां उठायचे. नंतर त्याचे सारे आटोपायला किती तरी वेळ लागायचा. गुणा बरोबर पुस्तक घेऊन जात असे. तेथेहि तो अभ्यास करीत बसे. किंवा वर्तमानपत्र तेथे असले तर वाचीत बसे.
“सारखे तुमच्या हातांत पुस्तक.” गुणवंतराय म्हणायचे.
“मला चांगल्या रीतीनें पास व्हायचे आहे. वरती यायचे आहे. शिष्यवृत्ति वगैरे मिळाली तर बरे होईल.”
“संगीताची ज्याला आवड त्याचे अभ्यासांत फार लक्ष सहसा नसते.”
“माझे हल्ली संगीतापेक्षा अभ्यासांत जास्त लक्ष आहे.”
“तुम्ही खरे संगीताचे भोक्ते नाहीत.”
“मी विद्यार्थी आहे अजून.”
गुणवंतराव गप्पाच पुष्कळ मारायचे. गुणालाच वाजवा म्हणायचे. आपण स्वत: ऐकायचे.
“मी वाजवून तुम्हांला कसे येईल वाजवतां?” गुणा म्हणे.
“खरे सांगू का; मला सारंगी आवडते. तुमची सारंगी ऐकावी एवढीच इच्छा. परंतु शिकण्याचे निमित्त केले. म्हणजे रोज तुम्ही येत जाल.”
गुणाच्या डोळ्यांसमोर महत्त्वाकांक्षा आज उभी होती. कोणती महत्त्वाकांक्षा? आपले एरंडोलचे घर पुन्हा परत मिळवायची महत्त्वाकांक्षा. त्या घराचे काय झाले असेल ते त्याला माहीत नव्हते. घरांचे लिलाव झाले असेल असे त्याला वाटे. परंतु वाटेल ती किंमत देऊन परत घेऊ असे तो मनांत म्हणे. बाबांना पुन्हां पूर्वीच्या घरी नेईन त्याचे अश्रु थांबवीन.