ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 2
“नको पाजूं.”
“आण रे पाजतें. तारायचें असेल तर देव तारील सर्वांना.”
आणि कावेरीनें बाळाला घेतले. बाळ ओढीत होते स्तन. जणुं शेवटचे पीत होतां दूध ! होतें नव्हते तेवढे पीत होता. परंतु हे काय ? बाळ एकदम आईच्या अंगावर ओकला आणि बाळाला जुलाब झाला. एक, दोन. मरणोन्मुख मातेच्या अंगावर बाळ होते. जगन्नाथ वेडा झाला. काय करावे त्याला कळेना. त्याने आपले धोतर फाडलें. बाळाचे अंग पुसलें. कावेरीला त्याने दुसरे एख धोतर गुंडाळले. बाळाला पुन्हां वांति झाली. आणि ते बाळ ! ते निष्प्राण झाले. आईजवळ निष्प्राण होऊन पडले.
“प्रेमा, प्रेमा !” तिनें हाक मारली.
प्रेमाची हालचाल थांबली होती आणि तिला पुन्हां वांति झाली.
“जगन्नाथ, जाणार हो मी. बाळ गेला, मिही जाते. पाप नको या जगांत. प्रेम जगांत राहू दे. पाप जाऊं दे. तूं रहा. तुला मी भुलविले, तुला फसविले. प्रेमपाशांत अडकवले. इंदिरेला. तुझ्या आईबापांना रडत ठेवले. मी कर्तव्य विसरून तुलाहि कर्तव्याची भूल पाडली. मी हरिजनांची सेवा सोडून तुला मिठी मारीत बसले. माझी प्रेमाची तहान भागवीत बसलें. पुरी झाली हो तहान राजा. या चंद्रभागेच्या तीरी पुरी झाली. माजी ती तहान संपली. आता क्रान्तीची ज्वाळा पेटत आहे ! परंतु हे शरीर गळत आहे. माझी क्रांतीची ज्वाळा तुझ्यांत ठेवून मी जातें. माझी प्रेमज्वाला शांत झाली. आतां क्रान्तीची ज्वाळा भडकूं दे. लाल ज्वाळा. जगातील सारी घाण जळूं दे. जगांत शांति, आनंद, समता आणल्यावरच ता शांत होऊ दे. तो पर्यंत नाही. इन्किलाब झिंन्दाबाद ! तिकडे विठोबाचा गजर होत आहे. इन्किलाब व विठोबाचा गजर एकरूप आहेत. विठोबाचे नाम जीवनांत क्रान्ति करतें. जीवनात क्रान्ति करील तेच नामोच्चारण. इन्किलाबची गर्जनाहि क्रान्तीसाठी आहे, अवघाचि संसार सुखाचा करण्याचाच तोहि विश्वमंत्र आहे. तो मंत्र तुझ्यांत ठेवून मी जाते. माझं बाळ, मी, जातो. क्रान्ति तुझ्याजवळ ठेवून जातो. क्रान्तीचा झेंडा हाती घे. ते लाखो भगवे झेंडें आपण पाहिले. त्याचा अर्थ ज्याला कळेल तो लाल झेंडा हाती घेईल.
जगन्नाथ; जगन्नाथ, तूं जग हो, जग हो. क्रान्ति करा. इंदिरा तूं, तुझे मित्र क्रान्ति करा. एक मागणे आहे तुझ्याजवळ. देशील ना ?
“कावेरी, अद्याप काय द्यायचे राहिले आहे ? मी तुला न देतां काय ठेवले आहे ?”
“जगन्नाथ, एक मागणे मागतें. तूं मला विसरून जा. बाळाला विसरून जा. हे एक स्वप्न समज.”
“स्वप्नेच अमर असतात. स्वप्नांतूनच जगाला सुंदरता मिळाली. कवींची स्वप्ने. कलावंतांची स्वप्ने, महात्म्यांची स्वप्ने, या स्वप्नांमुळेच मनुष्य मोठा आहे. मनुष्य स्वप्ने पाहूं शकतो, कल्पना रंगवूं शकतो, म्हणून तो मोठा. कावेरी ! तुझे माझे जीवन म्हणजे महान् स्वप्न, सत्यमय स्वप्न. तें कसें विसरूं ? तुझ्याबरोबर मलाहि येऊं दे. मला कां नाही होत अजून कांही ?”