कोजागरी 9
मुलें ऐकत होतीं. तिकडे झाडावर एकदम चिर्र आवाज झाला. घारीचा का आवाज? चिर्र आवाज. कोणा पांखराचा आवाज?
“सोनजी, तूं माझ्याजवळ कां नाहीं कधीं दूध मागितलेंस? तुझी बायको आजारी आहे हें मला माहीतहि नव्हतें.”
“तुम्ही मळ्यांत फार येत नाहीं. तुम्हांला कसें कळणार? तुमची शाळा, तुमचें गाणें वाजवणें. तुम्हांला कोठें आहे वेळ? आणि तुम्हीं कांहीं दिलें तरी तुमच्या घरांत तें समजणारच. बोलाचाली होतील. आम्हांला म्हणतील कीं, मुलाला फसवून सोनजी दूध वगैरे घेतो. तुम्हांला तर सारे भोळा सांब म्हणतात. तुमचे दादा तर एकदां आम्हांला म्हणाले, ‘त्या जगन्नाथजवळ कांहीं कधीं मागूं नका. तो वेडा आहे. घरांतले वाटेल तें देईल.’ तुमच्याजवळ सांगासवरायला जीव भितो. माझी बायको आजारी हें का तुमच्या दादांना माहीत नाहीं? परंतु परवां तिला पावसांत काम करायला त्यांनीं लावलें. ‘तुम्ही माजलींत, येथें सुखाने राह्यला संवकलींत,’ किती तरी बोलले. जनी रडत उठली. पावसांत काम करूं लागली. आम्हां गरिबांचा आजार, त्याची का काळजी करायची असते? तुमची गाय, म्हैस आजारी पडली तरी अधिक जपतां. त्या दिवशीं आपल्या मोत्याचें दिस-या एका कुत्र्याशीं भांडण झालें. मोत्याला लागलें होतें. तर त्याला गाडींतून दवाखान्यांत नेऊन मलमपट्टी लावून आणलेंत. परंतु आम्हांला कशाला हवं औषध? श्रीमंतांकडे गाई-गुरें व्हावें, कुत्रें-मांजर व्हावें, पोपट-मैना व्हावें, परंतु त्यांच्याकडे नोकर होणें नको. जगन्नाथभाऊ, तुमच्या घरच्या मांजरांना रोज अर्धा शेर दूध मिळत असेल. परंतु जनीसाठीं घोटभरहि आम्हांला मिळत नाहीं. जाऊं द्या. किती सांगायचे? बसायला घोंगडी आणूं का?”
“आहे का घोंगडी?”
“जनीच्या अंगावरची आणतों जरा काढून. ताप भरला आहे. हिंव थांबलें आहे. आतां घोंगडीची जरूर नाहीं.”
“नको हो सोनजी.” गुणा म्हणाला.
“सोनजी, आम्ही तुला आतां जाऊन दूध आणून देतों. कढत कढत दूध जनाला दे. आज कोजागरी आहे. जनी पिईल. बरें वाटेल तिला.”
“आम्हांला कोठली कोजागर पौर्णिमा! आमची नेहमीं होळी पौर्णिमा. सारी बोंबाबोंब. येईल तो दिवस काढायचा. ना कधीं विश्रांति, ना आनंद, ना नीट सणवार, ना कांहीं.”