येथें नको, दूर जाऊं 6
सकाळी त्याने दूध घेतले नाही. तो जेवायला गेला नाही. तसाच शाळेत गेला. शाळेमध्ये गडी बोलवायला आला. त्याने त्याला तसेच परत पाठविले. तो भुकेला होता. तरी आनंदी दिसत होता. मित्रप्रेमाच्या आनंदावर मनाला पोषण मिळत होते.
शाळा सुटून तो घरी आला. आपल्या खेलीत जाऊन तो बसला. त्याची आई आली.
“जगन्नाथ, तू काय आरंभले आहेस?”
“उपवास आरंभला आहे.”
“कशासाठी? परीक्षा तर आता नाही ना?”
“आताच आहे.”
“आता रे कुठली परीक्षा.”
“गुणा का आजारी आहे? तो आला नाही दोन चार दिवसांत.”
“तो कशाला येईल. कसाबांच्या घरी कशाला येईल?”
“असे काय बोलतोस?”
“आई, गुणाच्या घराची दादा जप्ती करणार, लिलाव करणार! माझ्या मित्राची, त्याच्या आईबापांची अब्रू घेणार, त्यांना रडवणार. मी काय करू? मला उपवास करूं दे. दादाला सदबुद्धि दे अशी देवाला प्रार्थना करू दे.”
“किती दिवस करणार उपवास?”
“दादाला सदबुद्धि येईपर्यंत.”
आम्हांला म्हातारपणीं तुम्ही रडवणार आहांत?”
“गरिबांना रडवू नको असे दादाला सांगा.”
“नाही का तू काही खाणार?”