राष्ट्रीय मेळा 6
घाण करूं जरि आपण दूर
देवाला तरि होऊं प्यार
संसार सुखानें सर्व तरूं ।।हा गांव.।।
झाडू म्हणजे देवचि माना
लाज ना माना हातीं घेण्या
ख-या हिताचा मार्ग धरूं ।।हा गांव.।।
चला उठा रे लहान मोठे
गावसफाई करुं या नेटे
आदर्श आपुला गांव ठरूं ।।हा गांव.।।
असें गाणें म्हणत ते झाडू घेऊन हिंडत. मो-या उपसीत. गावहाळाजवळ सफाई करीत. कोठे फिनेल टाकीत. एके ठिकाणीं एक म्हातारबाई येऊन म्हणाली, “माझ्या घरांत टाक रे तें तुझे थोडें पाणी. फार डांस बघ दादा.” आणि मुलगा फिनेल टाकून आला.
पंढरीशेटचा मुलगा हातांत झाडू घेऊन झाडीत आहे यांचे लोकांना आश्चर्य वाटे. ज्याची गावोगाव शेती, ज्याची लाखांची इस्टेट, त्याचा मुलगा हातात झाडू घेऊन फिरत होता. मो-या उपसीत होता. लोकांना कौतिक वाटे. तेहि झाडायला निघत आणि गाव निर्मळ होई. गावकरी या मुलांना जेवायला देत. दुपारी मुले चरखे, टकळ्या घेऊन कातीत. बाया व पुरुष पाहावयास येत आणि मुले गाणी म्हणत :
चरखा फिरवा
तुम्हि घांस सुखाचा मिळवा ।।चरखा.।।
घरींच तुमच्या असे कपाशी
कां होता मग तुम्ही आळशी
हातीं बंधू घ्या चरख्यासी
दैन्य हरवा ।।तुम्हि.।।
चरखा दवडिल उपासमार
चरखा गरिबांचा आधार
सूत दुधाची जणुं ही धार
निश्चय ठरवा ।।तुम्हि.।।
चरख्याचे सप्ताह करावे
गावांपुरतें सूत निघावें
गांवांतचि तद्वस्त्र विणावें
निश्चय ठरवा ।।तुम्हि.।।
क्षण एकहि ना दवडा फुकट
दारिद्र्याची दवडा कटकट
निवारील हा चरखा संकट
ध्यानी ठेवा ।।तुम्हि.।।
आणि टकळीचेहि एक सुंदर गाणे होते :