जगन्नाथ 16
“खरेच कधीं झुगारू? माणूस तेवढा एक असे कधी वाटेल?”
“समाजवाद येईल तेव्हा. हे आर्थिक झगडे आहेत. नोक-यांचे झगडे. परंतु ज्या वेळेस नवसमाजरचना येईल, बेकारी जाईल, सर्वांना सारखा विकासास वाव मिळेल, मुलांना खायला काय द्यायचे ही फिकीर राहाणार नाही त्या वेळेस मनुष्य आंत डोकावू लागेल. मग माणूस माणसाला ओळखील. केवळ नात्यागोत्याच्या ओळखी जाऊन माणुसकीची महान् ओळख पटेल. माणसाने माणसाला ओळखण्याची खरी संस्कृति यावयास पाहिजे असेल तर समाजवादच हवा. तोपर्यंत संस्कृति नाही.”
“तुमच्याकडचे रस्ते किती लाल. सारी मातीच लाल. दगडहि लाल. येतांना वाटेत लहान लहान नद्या लागत; त्यांच्या रित्या पात्रांतून लाल लाल रेती व वाळू दिसे.”
“आमच्याकडे लाल झेंडा आहे; भूमातेची लाल झेंडा. वंदे मातरम् चा लाल झेंडा. तुम्हांला माहीत आहे का एक गोष्ट?”
“कोणती?”
“वंदे मातरम् लिहिणा-या बंकिमचंद्रांनीच हिंदुस्थानांतील साम्यवादावरील पहिले पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव ‘साम्य.’ वंदे मातरम् गीताचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर साम्यवादी व्हायला हले. ऋषि बंकिम तरी तसे म्हणतील. तोंडाने वंदे मातरम् म्हणून भ्रातरंला उपाशी ठेवणारे, त्याला अस्पृश्य मानणारे, यांना का त्या महान् गीताचा अर्थ समजला?”
“महाराष्ट्रांतहि विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून एक मोठे सुधारक व विचारवंत होऊन गेले. त्यांनीहि १८७० च्या सुमारास एक प्रकारचा समाजवाद उदघोषिला होता. परंतु महाराष्ट्रांतील लोकांना त्यांचे नाव माहित नाही.”
“बंकिमचंद्रांनीं ‘साम्य’ पुस्तक लिहिले ही गोष्ट तरी वंदे मातरम् म्हणणा-यांपैकी कितीकांस माहीत असेल? जगन्नाथ, तुम्ही क्रांतिकारक व्हा. जुने क्रांतिकारक नव्हे. हिंदु-मुसलमान द्वेषांतून ज्यांना राष्ट्रीयतेची दीक्षा मिळाली अशा त्या प्रतिगामी क्रांतिकारकांसारखे नका होऊ. नव क्रान्तिकारक. समाजरचनेंत क्रान्ति करणारे. मूल्ये बदलणारे. खालचे वर करणारे, वरचे खली खेचणारे. पाताळांत दडपलेल्याला वर आणणारे व तिस-या मजल्यांत ऐटीने राहणा-या बांडगुळास खाली आणणारे व्हा. असे व्हा. भूमातेचा लाल झेंडा उचला.” असे म्हणून कावेरीने लाल धुळीचे बोट जगन्नाथच्या कपाळाला लावले.