इंदु 28
“मग कुणाचा बघू?”
“आणि दुसरा एक फोटो घेऊन आलीस तो कोठे आहे?”
“गुणा, कुणाचा रे तो?”
“तो तुला आवडला की नाही सांग.”
“माझ्या फोटोपैक्षां तो चांगला आहे. परंतु पुष्कळ वेळां फोटोंत मनुष्य चांगला दिसतो. तसा तो असतोच असे नाही.”
“आणि पुष्कळ वेळा मनुष्य फोटोहून सुंदर दिसतो. फोटोत तितका चांगला येत नाही.”
“फोटो म्हणजे सत्य नव्हे.”
“बघूं तो फोटो—कुमुदिनीचा फोटो.”
“मी नाही देणार तो. कशाला हवा तुला तो?”
“तुला तिची गोष्ट सांगायला.”
“सांग गोष्ट. खरे सांग हो.”
“आंघोळ करून येतो व मग सांगतो. ती पवित्र गोष्ट आहे. पवित्र होऊन सांगावी.” असे म्हणून गुणा गेला.
त्याने आंघोळ केली. तो कपड्यांना साबण लावीत बसला.
“हे काय गुणा, मी धुवीन म्हणून सांगितले ना? डॉक्टरांनी कपड्यांना साबण नाही लावायचा. जरा कुणाला तपासले की लगेच हाताला फक्त साबण लावायचा. डॉक्टरांची ऐट असते गुणा. ऊठ, ती गोष्ट सांग आधी.”
“गुणाने इंदूला ती करुण कहाणी सांगितली.