गुणा कोठें गेला गुणा? 2
“आणखी कोण दूर आहे?”
“आणखी कोण?”
“अरे, शिरपूरला हो.”
“अजून ती आठवण येत नाही. ओळखच नाही.”
“होईल ओळख. मग गुणाची आठवण कमी होईल. आमची तर झालीच आहे कमी. जाणा-यांची, लौकर मरणा-यांची कशाला आठवण? नवीन कळ्या गोड दिसतात, ताजी फुले छान दिसतात.”
“आई, गुणा ताज्या फुलाप्रमाणेच घवघवीत दिसायचा?” असे म्हणून तो चरण गुणगुणूं लागला.
“ताज्या फुलापरि दिसे मुखडा गुणाचा
माझा गुणा मधुमना पुतळा गुणांचा”
ते चरण गुणगुणत तो जाऊ लागला.
“अरे, दूध पी व मग जा.”
“गुणा येणार आहे. तो व मी बरोबर पिऊ आणि मग जाऊ.”
बराच वेळ झाला. गुणा आला नाही. तो खाली काही तरी बोलणे चाललेले त्याच्या कानी आले. तो ऐकू लागला.
“अहो घराला कुलूप आहे.”
“गाव सोडून गेले की काय?”
“अब्रू जायची पाळी आली. कशाला राहतील?”
“वाड्याचा लिलाव होणारच होता. तो काही टळत नव्हता.”