इंदु 9
“माझे बोलणे तुला आवडते?”
“हो. कधी सुद्धा कंटाळा नाही येणार.”
“फार बोलत नाही म्हणून. सारखा बोलत बसलो तर कंटाळशील. म्हणून जरा उशिरा येतो. वाट बघशील. गोडी वाटेल. उत्कंठेत गोडी आहे. भुकेत गोडी आहे.”
“गुणा, आज तूंच वाजव सारंगी. बरेच दिवसांत तू वाजवली नाहीस. आज पोटभर ऐकूं दे. मनमोकळी.”
गुणा सारंगी वाजवूं लागला. इंदूची आईहि येऊन ऐकत बसली. तिघे संगीतसागरांत पोहत होती. आणि मनोहरपंत बाहेरून आले व तेहि बसले. गुणाने डोळे उघडले. त्याने सारंगी खाली ठेवली.
“बाबा, तुम्ही काधी आलेत?”
“गुणा, अरे चोर आले असते, तर तुम्हांला कळलेहि नसतें. आणि इंदु, तू गुणालाच वाजवायला सांगत जा. तुला केव्हा येईल वाजवायला?”
“बाबा, त्यांचे हात मला द्या. एरव्ही नाही वाजवतां येणार.”
“इंदु, शीक हो वाजवायला. संगीत म्हणजे सर्व संकटांतील सखा. संगीत म्हणजे आधार आहे. इंदु, आम्ही तुला किती दिवस पुरणार?”
“असे काय बाबा बोलतां?”
“आज हेच विचार माझ्या मनांत आले. त्या विचारांत मी फिरत फिरत किती दूर गेलो ते मला समजले नाही.”
“मी जातो. आई वाट पहात असेल.”
“गुणा, आज येथेच जेव ना.” इंदु म्हणाली.