शेवटी सारे गोड होतें 2
“खरेच, त्यागमूर्ति आहेत. मीहि एक अशी त्यागमूर्ति कलकत्त्यास पाहिली. कुमुदिनी तिचे नाव! माझी सारंगी ऐकतां ऐकतां तिचे प्राण उडून गेले. जगन्नाथ, असे प्रसंग जीवनांतील अनंततेचे दर्शन घडवतात; जीवन किती गहन, गंभीर, खोलखोल आहे ते अशा प्रसंगी दिसून येते.”
“तिचे का तुझ्यावर प्रेम होते?”
“मला काय माहीत? ती आजारी होती. तिचा बाप मला सारंगी वाजवायला बोलवी. म्हणे कुमुदिनीला सारंगी ऐकून बरे वाटते. तिला जरा झोप लागते. एकदा तिने माझा एक फोटो मागितला. मी दिला. तो फोटो जवळ धरूनच ती देवाघरी गेली. माझी सारंगी ऐकतां ऐकतां अनंत निद्रेंत मिळून गेली. चिर निद्रा!”
“आणि कुमुदिनी बरी झाली असती तर?”
“तर काय?”
“तर तिने तुला का नाचवले असते? मी कावेरीचा वेडा तसा तू का कुमुदिनीचा वेडा झाला असतास?”
“काय झाले असते मला काय माहीत? देवाने आधीच पडदा पाडला. शोकात्न नाटक होऊं दिले नाही.”
“दयाराम माझी आठवण काढीत का?”
“हो. काढीत. म्हणत, येईल हो तो. इंदिरेला मरतां मरतां आश्वासन देत म्हणाले, येईल हो जगन्नाथ. परंतु त्याला खरोखर जगाचा नाथ होऊ दे. दीनानाथ होऊ दे.”
इंदु घरी वाट पाहत होती. इंदिरा वाट पहात होती. आणि आज इंदु इंदिरेकडे गेली होती. इंदिरेचे मन आज फार निराश झाले होते. तिचे सूत दोन दिवसांपासून सारखे तुटत होते. नाही नाही ते तिच्या मनांत येई. ती घाबरली होती.
“इंदु, परवापासून सूत सारखे तुटत आहे. असे कधी होत नसे. डोळे मिटूनहि मी सूत काढते. कसे सरळ सुंदर येते. परवापासून हे असे होते. कालपासून जरा कमी होत आहे. का ग असे होते?”
“बघूं, मी जरा काढतें.”
आणि इंदु इंदिरेच्या चरख्यावर कांतीत बसली. धागा अखंड येऊं लागला. तूट नाही कांही नाही.
“छान येऊं लागला धागा!” इंदु म्हणाली.