इंदु 7
“इंदु, डॉक्टर का सुटाबुटावरून ओळखायचा असतो? डॉक्टर त्याच्या ज्ञानावरून ओळखला जाईल. नाही का?”
“परंतु तुला असे कोणी म्हटले तर मला वाईट वाटते. तुला नावे ठेवली तर मला राग येतो.”
“कोणी ठेवली नावे?”
“बाबासुद्धां एखादे वेळेस ठेवतात.”
“कां बरे?”
“तूं हरिजनवस्तींत झाडायला गेलास तें बाबांना नाही आवडले. मी त्यांच्याजवळ भांडले. शेवटी म्हणाले तुम्ही नवीन मुलें काय काय कराल ते देवाला ठाऊक.”
“इंदु, तू माझी बाजू कां घेतेस?”
“तू मला आवडतोस म्हणून?”
“मी तुला मारीत असे तरीही आवडतो?”
“तुझ्या थापट्या जणुं ताल धरीत असत. परंतु आतां नाही मारीत.”
“आतां आपण मोठीं नाही का झालो इंदु?”
“म्हणून तर मी भांडते.”
“इंदु, तुला मी आवडतो कीं मी जें करतों तें आवडतें?”
“तूं आवडतोस म्हणून तूं जें करतोस तें आवडतें.”
“हरिजनांची सेवा करायला तूं नाहीं येणार?”
“तूं बरोबर असलास तर येईन.”
“आणि समज मी नसलो बरोबर तर?”