कोजागरी 2
कितीतरी तो अवलिया त्या दिवशीं बोलला. ज्याचें हृदय प्रेमानें भरलेले आहे, त्यानें पान दिलें तरी तें सोनें आहे. आणि अहंकारी माणसानें सोनें दिलें तरी तें माती आहे. विजयादशमीस आपण पानांचें सोनें वांटतों! या सोन्याचा का कधीं दुष्काळ पडेल! पिंवळें सोनें कमी होईल, परंतु हें हिरवें सोनें भरपूर आहे. हृदयाची श्रीमंती असेल तर सारें सोनेंच आहे. ज्यानें स्वत:ला जिंकलें, त्याने दिलेलें पान, तें कुबेराच्या संपत्तीहून श्रेष्ठ आहे, अधिक वजनदार आहे.
ज्या समाजांत एकमेकांवर प्रेम करणारे लेक आहेत, मी व माझें याची सीमा ओलांडून पलीकडचें पाहणारे लोक आहेत, दुस-याच्या सुखदु:खांशीं स्वत:चाहि संसार जोडणारे लोक आहेत, अशा समाजांत सोन्याला तोटा नाहीं. अशा समाजांत सोनें एकाच्याच घरीं राहणार नाहीं. धान्य एकाच्याच कोठारांत असणार नाहीं. जो तो स्वत:जवळ असेल तें सर्वांना देईल. सारेच आपले असें प्रत्येक जण म्हणेल. दुष्काळावर, दैन्यावर, दारिद्र्यावर, कलीवर हा खरा महान् विजय. असा विजय पाहिजे असेल तर करा मोठीं मनें, करा अस्पृश्यता दूर, वापरा खादी, घ्या मुसलमानांना जवळ, द्या जवळ असेल तें श्रमणारास. आपापल्या हवेल्यांत, जमाखर्चाच्या वह्यांत आत्मा गुदमरवूं नका. जाऊं दे आत्मा सीमा ओलांडून सर्वांना मिठी मारायला. किती उदबोधक तें भाषण!
“गुणा, आपण त्या दयाराम भारतींची ओळख करून घ्यायला हवी.”
“मलाहि वाटतें. त्यांच्याकडे जीव ओढतो.”
त्यांचें नांवहि किती गोड. खरेंच ते दयाराम आहेत.”
“आणि भारताशीं एकरूप झालेले आहेत. ‘माझे आईबाप मेले व मी भारताचा झालों. सीमोल्लंघन केलें. दयाराम भारती नांव घेतलें,’ असें नाहीं का त्यांनी सांगितलें?”
“परंतु नांवाप्रमाणें ते राहूं इच्छितात. नाहीं तर नांवें अमुकानंद, तमुकानंद अशीं घेतात व मनांत तर रडत असतात. नांव म्हणजे जणुं स्मरण जीवनांतील ध्येयाचें स्मरण.”
“माझें नांव गुणा. मी गुणांचा झालें पाहिजे. दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे.”
“आणि मी जगन्नाथ! जगाचा मी नाथ झाले पाहिजे. अनाथांचा नाथ. आसपासच्या गरिबांचा तरी नाथ. गुणा, काय होईल आपल्या हातून? कांहीतरी आपण पुढें करूं हो.”
“तूं परवां कोजागरी साजरी करूं म्हणत आहेस ना? त्या दिवशीं रात्री आपण दयाराम भारतींना बोलावूं, ते कांहीं सांगतील. त्यांच्याशीं आपण बोलत बसूं. चालेल का?”
“खरेंच. चांगली आहे कल्पना. ते प्रवचन करतील, नंतर तूं वाजव, मी गाईन. मजा येईल.”