मोलकरीण 29
“माले, हे अश्रू येणारच हो मधूनमधून ! सुंदर, स्वच्छ सूर्य़नारायण तळपत असतो. सर्वत्र स्वच्छ प्रकाश असतो. मध्येच पातळ, झिरझिरत सजल मेघ येतो व झिमझिम पाऊस पडतो-त्या वेळचे ऊन किती रम्य दिसते ! पावसाच्या थेंबांनी, त्या मोत्यांच्या सरांनी नटलेले ऊन-ते दृश्य फार मनोहर दिसते. कोकणात त्याला ऊन-पाऊस-गंगा म्हणतो आम्ही. ऊन असताना पडणारा पाऊस गंगेप्रमाणे पवित्र आहे. माले, आपल्या संसारात आता सत्सुखाचा सूर्य तळपत आहे; परंतु हे अश्रू मधून मधून येणारच आणि या सुखाच्या सूर्याला सौम्य करणारच. ही ऊन-पाऊस-गंगा आहे-” बाळासाहेब काव्यमय बोलत होते व त्या काव्यसरोवरात मालती हंसीप्रमाणे पोहत होती.
बाळासाहेबांनी चळवळ सुरू होताच राजीनामा पाठवून दिला. लोक चकित झाले. खेड्यापाड्यांतील लोक त्यांच्याकडे पूज्यबुद्धीने पाहू लागले. गोरगरिबांशी ते एकरूप होऊन वागू लागले, अडल्यापडलेल्याला ते मदत करू लागले. बाळासाहेब गावाच्या तक्रारीची दाद मागत. त्या गावचे ते भूषण झाले.
एके दिवशी सायंकाळी मळ्यातून भाजी घेऊन घरी आले. मालती स्वयंपाक करीत होती. राधाबाई मुलांना गोष्टी सांगत तुळशीजवळ बसल्या होत्या. बाळासाहेबही आईजवळ येऊन बसले.
बाळासाहेब : आई, तू मुलांना त्यांची आजी म्हणून खेळवीत आहेस, नाही ?
आई : बाळ, अरे, तेव्हाही मी आजी म्हणूनच खेळवीत असे, न्हाऊमाखू घालीत असे. भाडोत्री म्हणून नव्हते हो करीत. वरून मोलकरीण, परंतु आत हृदयाने मी मुलांची आजी होत्ये आणि तुझी आईच होत्ये.
बाळासाहेब : आई, तुझी सून आता सारे काम करते, तुझे लुगडे धुते, तुझे अंथरुण घालते, तुझे पाय आम्ही दोघेजण चेपतो; तुला आनंद न् समाधान नाही वाटत ?
आई : बाळ, खरे सांगू का ? तुमची अंथरुणे घालण्यात, तुमची धुणी धुण्यात, तुमचे काम करण्यात मला जितका आनंद वाटत असे, तितका काही आज वाटत नाही. मातेचा खरा आनंद मुलांची मोलकरीण होण्यातच आहे आणि पुनः मुलाला कळू न देता त्याची मोलकरीण होऊन राहणे, यातील गुप्त आनंद ! तो तर अपूर्वच आहे ! बाळ, प्रत्येक आईला मुलांची प्रेमसेवा करणारी मोलकरीण व्हावे असेच वाटते. तेच तिचे खरे भाग्य ! तोच तिचा खरा आनंद !!