मोलकरीण 28
बाळासाहेबांनी गाडी वगैरे लावून घराच्या जमिनी नीट करून घेतल्या. पुढचे-मागचे अंगण करून घेतले. मालतीने सुंदर तुळशीवृंदावन घातले. घराजवळ लहानसा गोठा बांधून दोन गाई दुधाला घेतल्या. गावाजवळील एकदोन शेते बाळासाहेबांनी खरेदी केली. त्यांनी त्या शेतात विहिर खणली, तिला चांगले पाणी लागले. त्या शेतात त्यांनी मळा करायचे ठरविले व बाजूला देवकापशीची झाडे लावण्याचे योजिले. चरखा बरोबर आणलाच होता.
अंबादेवीची ओटी भरावयाची होती. मुंबईहून येताना १०८ खण आणलेले होते. १०८ नारळ घेण्यात आले. नरेश व दिनेश यांना कपडे घालण्यात आले. एका गाडीत नारळ व खण घालून गडी पुढे गेला. राधाबाई गावात अजून कोठे जात नसत. परंतु त्याही आज देवीच्या मंदिरात जाणार होत्या. राधाबाई, बाळासाहेब व मालती, नरेश व दिनेश सारी मंदिरात गेली.
मालतीने अंबादेवीची पूजा करून तिची ओटी भरली. तिच्यापुढे ते खण व नारळ तिने ठेविले. मुलांना तिने अंबादेवीच्या पायांवर घातले. “आता तुम्हालाही घालत्ये.” मालती मंद स्मित करीत बाळासाहेबांना म्हणाली. बाळासाहेबांचे डोके मालतीने देवीच्या पायांवर ठेवले. ‘माते, आम्हा तुझ्या लेकरांस सुखरूप ठेव, सुबुद्धी दे.” असे प्रार्थून देवीचा अंगारा तिने मुलांस लावला. पतीच्या कपाळी लावला व स्वतःलाही लावला.
नारळ व खण गावात सर्वत्र वाटून देण्यात आले. गोरगरिब, गावातील गडी, मजूर यांच्याही घरी देण्यात आले. गरिबांना देणे म्हणजेच खरोखर देवाला देणे होय.
मालती व बाळासाहेब एके दिवशी परसात हिंडत होती. बाळपणाच्या आठवणी बाळासाहेब सांगत होते, “माले, हे आंब्याचे झाड. याला मी लहानपणी गळती लावायचा.” मालतीने विचारले, “गळती म्हणजे काय ?” एक करवंदीच पान घ्यावयाचे. ते काट्याने आंब्याच्या झाडाला टोचून ठेवावयाचे. म्हणावयाचे, “आंब्या आंब्या पडिच्चो. नाही पडला तर अडिच्चो.” म्हणजे ‘जर पडला नाही तर तुला आढीत जावे लागेल. तेथे गुदमरावे लागेल !’ असे मी मोठ्याने म्हणायचा. एक दिवस बाबा रागे भरले होते, तर मी या झाडाखाली येऊन बसलो होतो. मग आई मला प्रेमाने घेऊन गेली.”
“माले, काल तू मला अंगारा लावला होतास. परंतु शाळेत शिकत असताना आईने प्रेमाने पाठविलेला अंगारा-तो आम्ही पायाखाली धुळीत मिळविला होता. आता जणू पुर्नजन्म झाला आहे, नाही ? हे पहा बेहेळ्याचे झाड. बेहेळ्याच्या बिया फोडून आम्ही लहानपणी खात असू.”
“हे बाबांच्या हातचे पपनशीचे झाड. पाणी मिळायला लागल्याबरोबर बघ कसे टवटवीत दिसू लागले ! बाबांनी लावलेल्या या झाडाला अमृतमय फळे आली ! परंतु ह्या झाडाला मात्र विषमय फळे येऊन त्याने लावणा-याचेही प्राण घेतली !” असे म्हणून बाळासाहेब सद्गतीत झाले.
“आता त्याला काय करायचे ? त्याला काही इलाज आहे का ? रडू नये असे.” मालती प्रेमाने म्हणाली.