शशी 13
गायीला बांधायची आठवण शशीला राहिली नाही. तो गायवासरांना पाहातच राहिला, किती भूक लागली आहे याला ! “पी, पी” असे तो म्हणू लागला. शशीची आई पाणी भरून गोठ्यात आली तो वासरू दूध पीत आहे व शशी “पी, पी, पी” म्हणत आहे, हा देखावा तिने पाहिला. ती संतापून ओरडली, “अरे, काय कार्ट्या ! गाय बांध म्हणून ना सांगितले तुला ? नुसता अजागळासारखा पहात काय राहिलास ? काडीचा उपयोगाचा नाहीस तू. शुंभ नुसता ! आता रात्री दूध कोठले ? सगळे दूध प्यायले, वासरू !” पार्वतीबाईंनी गायीला काठी मारली व तिला दाव्याने बांधले. वासरू ओढ घेत होते. त्या वासराला गायीजवळ जाता येत नव्हते. गाय हंबरू लागली व वासरू हंबरू लागले.
“आई सोड गं त्याला. अर्ध्या जेवणावरून उठवू नये म्हणून तूच ना म्हणतेस ? गायीचे दूध वासरासाठीच आहे. तुझे दूध मधूसाठी तसे गायीचे वासरासाठी.” शशी बोलला.
“चहाटळ आहेस तू. नीघ येथून !” पार्वतीबाईंनी धसरा घातला. तिकडे घरात पाळण्यामध्ये लहान मधू रडू लागला होता. “जा त्याला जरा आंदूळ तरी ! एवढी शेवटची पाण्याची खेप घेऊन येते मी.” असे बजावून पार्वतीबाई घागर-कळशी घेऊन गेल्या. शशी आपल्या भावास आंदळू लागला. मधूला आंदळताना आई ओव्या म्हणे, त्या ओव्या तो म्हणू लागला-
गायी घरी आल्या। देव मावळला
बाळ नाही आला। कैसा घरी।। अंगाई
गायीच्या पान्हयासाठी। वासरे हंबरती
खेळून बाळ येती। तिन्हीसांजा।। अंगाई
तिन्हीसांजा झाल्या। दिवे लागले घरात
गाई चाटती गोठ्यात। वासरांना।। अंगाई
पाखरे घरी गेली। बाहेर सांजावले
खेळून आली बाळे। आईपाशी।। अंगाई
पाऊस पडतो आकाशी। आकाशी लवे वीज
तान्ह्या बाळा तू रे नीज। पाळण्यात।। अंगाई
बाहेर अंधार। पडे काळाकुट्ट
बाळा झोप नीट। पाळण्यात।। अंगाई
ओव्या म्हणता म्हणता शशी तल्लीन झाला होता.