शशी 37
अमीन नाही तर नाही, अमीनची गादी तर आहे, या विचारतच बाळ शशी समाधान मानीत होता. परंतु शशीच्या दुखण्यास उतार पडण्याचे लक्षण दिसेना. दुखणे वाढत चालले, विकोपास गेले. संशयी हरदयाळांच्या मनात संशय आला. या मुसंड्यांनी काही जादूटोणा तर नाही ना केला ? ही गादी घातल्यापासून पोराचे दुखणे वाढले, असे त्यांच्या मनात आले. तो संशय वाढला. ती गादी काढून टाकून जाळून टाकावी, असे त्यांनी ठरविले. शशीच्या खालची अमीनची गादी काढण्यात आली. ती गादी अंगणात नेऊन त्यांनी जाळली. अमीन ते दुरून पाहात होता. शशीला भेटण्यासाठी म्हणून तो आला होता. परंतु घरात शिरण्याचे धैर्य त्याला झाले नाही. तो रस्त्यावरच घुटमळत होता. आपण दिलेल्या गादीचे भस्म पाहून अमीन रडू लागला. तो घरी आला. दादूला त्याने सारे सांगितले. दादूचा चेहरा गंभीर झाला.
शशीचे दुखणे वाढतच गेले; गादी काढून टाकण्याने कमी झाले नाही. कोणी तरी हरदयाळांना म्हणाले, “हरदयाळ, काय केलेतं हे पाप ! अहो, ती गादी नव्हती, ते अमीनचे मृदू-मधु हृदय होते. त्या प्रेमाच्या उबेवर आजपर्यंत शशी जगला. त्याचे ते प्रेमामृत तुम्ही दूर केले. आता मात्र भरवसा नाही. आता ही वेल सुकणार, हे फुल गळणार, हा शशी मावळणार ! काय केलेत, हरदयाळ ? फुलाचा देठ तोडलात, रोपांची मुळे तोडलीत, माशाचे पाणी दूर केलेत ! हरदयाळ, काय हा मत्सर ! केवढा द्वेष !”
शशी शांत पडला होता. मध्येच ‘अमीन !’ म्हणून क्षीण वाणीने तो उच्चारी. अमीनची व त्याची भेट झाली नाही. स्वप्न-सृष्टीत तो अमीनला का पाहात होता ?
सायंकाळ झाली होती. दिवे लावावयाची वेळ. दिवा लावण्यासाठी हरदयाळ गेले. शशीजवळ कोणी नव्हते. ओसरीवर तो कोण चोरासारखा उभा आहे. दारातून कोण डोकावत आहे ? हा तर अमीन ! हरदयाळ शशीच्या अंथरुणापासून दूर जाताच अमीन वा-यासारखा आत गेला. अमीन शशीजवळ जाऊन काप-या व भरल्या आवाजाने ‘शशी’ म्हणून हाक मारता झाला. शशीने आपले प्रेमसरोवर डोळे उघडले. “शशी !” अमीनने हाक मारली. “अमीन !” क्षीण स्वरात शशी बोलला. होती नव्हती ती शक्ती एकवटून शशी जरा उठला व त्याने अमीनला मिठी मारली. “अमीन, अमीन !” “शशी, शशी !” त्या दोन कोमल व भावनोत्कट शब्दांशिवाय ते दुसरे काहीएक बोलत नव्हते. त्या दोन शब्दांत सा-या कुराणांचे सार होते, सारी खरी सत्संस्कृती साठविलेली होती, सारे जीवनाचे तत्त्वज्ञान होते. “अमीन ! अमीन !” “शशी ! शशी !”
हरदयाळ दिवा लावून तेथे आले. दिव्याची वात त्यांनी मोठी केली. त्यांना वाटले, मुलाला वात झाला. परंतु तेथे त्यांना कोण दिसले ? तो अमीन ! मुसंड्यांचा मुलगा घरात बिछान्याजवळ ! “अरे ऊठ; असा आत काय आलास माझ्या घरात ? उठ, चालता हो, नीघ म्हणतो ना !” हरदयाळ अंगावर धावले, हरदयाळांचा हात ढकलून अमीनने पुनः शशीला मिठी मारली- “शशी !”
“अमीन ! अमीन ! ”
हरदयाळांचा राग अनावर झाला. कोप-यातील धुणे वाळत घालण्याची काठी त्यांनी घेतली व अमीनच्या कमरेत हाणली. अमीनचे पेकाट मोडले. अमीन ओरडला; कळवळला! दुसरी काठी ! अमीन घरातून ओरडत बाहेर पडला ! शशी अंथरुणावर पडला !