मोलकरीण 2
राधाबाई कितीतरी व्रतवैकल्ये करीत होत्या, त्यांनी वडापिंपळाचे पार झिजविले, अनेक नवससायास केले, उंबरांना प्रदक्षिणा घातल्या ! शेवटी एकदाचा राधाबाईंना मुलगा झाला. त्यांची इच्छाशक्ती फळाला आली. मनीचे मनोरथ पुरले. आनंदाला आकाश ठेंगणे झाले. त्या मुलाला कोठे ठेवू, कोठे न ठेवू असे राधाबाईंना झाले. गोविंदभटजी घरीच होते. गोविंदभटजींनी बारसे थाटामाटाने केले, मुलाला पाळण्यात घालण्यात आले, गावातील चार सुवासिनी आल्या, पुत्रवंतिणी आल्या. बाळाचे नाव भास्कर असे ठेवण्यात आले.
मुलाचे नाव भास्कर असे असले तरी त्याला ‘बाळ’ या नावानेच आईबाप हाक मारीत. बाळ चंद्रकोरेप्रमाणे वाढत होता. गोविंदभटांनी मुलाला गळ्यातील ताईत केला, हांसोळी केली. मनगट्या केल्या,त्यांच्या कुंचीला त्यांनी मोत्याचे पिंपळपान केले. ते पिंपळपान बाळाला फारच खुले बाळ आधीच सुंदर होता. त्या अलंकारांनी तो अधिकच सुंदर दिसे. राधाबाई सारखे मुलाचे कौतुक करीत. अक्षयी बाळाची लीला त्यांच्या तोंडी. बाळाचे गुणवर्णन करण्याचा, सौदर्य कथन करण्याचा त्यांना कधी कंटाळा येत नसे. वेणी घालायला, दुपारी बसायला कोणी शेजारची बाई आली की राधाबाईंचे बाळपुराण सुरू होई. साहजिकच आहे; उतारवयातील एकुलता एक मुलगा-मोठा गोड, गोजिरवाणा. मग त्याचे लाड किती होत असतील हे सांगावयास नको !
बाळ रांगू लागला, चालू लागला, बोलू लागला. त्याचे बोबडे बोल मायबापांच्या हृदयात आनंदसागर निर्माण करीत. त्याचे उष्टावण झाले. राधाबाई बाळाला कडेवर घेऊन चिमण्या-कावळे दाखवीत, आजूबाजूची हिरवी-निळी सृष्टी दाखवीत, घास भरवीत. बाळ खरकटे आईच्या खांद्याला पुशी, आईच्या तोडांवर घाशी. राधाबाई रागवत नसत. मुलाचे खरकटे तोंडाला लागून त्यांना धन्य वाटे.
राधाबाई मुलाला श्लोक शिकवीत. तिथी-वार शिकवीत. कधी त्याला लहान लहान गोष्टी सांगत. गोविंदभटजी घरी असले म्हणजे तेही बाळाला हसत-खेळत शिकवीत. बाळाला आंघोळ घालीत. आपल्या नेसूच्या धोतरानेच त्याचे अंग पुशीत, तोंडाने गंगाष्टक म्हणत. बाळाला “ध्येय: सदा सवितृमंडलमध्यवर्ती” वगैरे श्लोक सांगून नमस्कार घालावयास सांगत. नमस्काराचे तीर्थ बाळ आईबापांस नेऊन द्यावयाचा.
बाळ वाढता वाढता आठ वर्षांचा झाला. त्याची मुंज झाली. गरिबीतच पण जरा वाजतगाजत मुंज झाली. गोविंदभटांनी बाळाला संध्या शिकविली. बाळ मराठी शाळेत जात होता. तो फार बुद्धीमान होता. त्याचा सदान् कदा पहिला नंबर. ध्रुवाच्या स्थानाप्रमाणे बाळाचे स्थान अढळ असे.
मराठी संपल्यावर बाळाला इंग्रजी शाळेत घालण्यात आले. राजापूर येथे छात्रालय होते. त्या छात्रालयात बाळाची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे राहून तो इंग्रजी शाळेत जाई. छात्रालयात गेल्यावर बाळाचा नवीन अवतार सुरू झाला. त्याने डोक्यावरचे केस राखले. कपाळाला गंध वगैरे तो आता लावीत नसे. संध्या करण्याचा रानटीपणा त्याने आता सोडून दिला ! हॉटेलमधले पदार्थ त्याला आवडू लागले ! हॉटेलमधल्या पदार्थांची यादी त्याला पाठ असे ! बाळाचे कपडे परीटघडी इस्तरीचे होऊ लागले ! बाळ हा गोविंदभटजींचा मुलगा आहे असे कोण म्हणेल ? तो गावठी साहेबांचा मुलगा आहे असेच त्याच्या बाह्य वेषावरून वाटले असते व कोणी म्हटलेही असते.