शशी 28
एके दिवशी रविवार होता. रघूचाच पाय लागून बैठकीवर शाई सांडली होती. परंतु रघू एकदम ओरडून म्हणाला, “अरो शश्या, दिसत नाही का माझा दौत ! सारी दौत सांडलीस. आता बाबा रागे भरतील. आई, या शश्याने शाई सांडलीन ग.” रघूची आई वर आली व ती शशीला रागे भरली. “डोळे नाहीत का रे तुला ? भऱलेली दौत उपडी केलीस ती ? खिदळायचे होते तर खाली जागा का थोडी होती ? उगाच नाही आईबापांनी इकडे धाडला ! मी आपली म्हणत असते की, जाऊ दे. आईबापांपासून दूर आहे, उगीच हात लावला तर घरी जाऊन सांगायचा, की आत्याने छळले म्हणून. परंतु बोलत नाही तर फारच शेफारलास !” असा आत्याचा पट्टा सुरू झाला. मिठाराम म्हणाला, “आई, दादाचाच पाय लागून दौत सांडली ग. तोच शशीला वेडावीत होता व नाचत होता. ती बघ त्याच्या पायाला शाई लागली आहे !” रघूनाथ मिठारामवर धावून म्हणाला, “खोटे सांगतो का रे, मिठ्या ! मी नाचत होतो का शशी ? शाई सांडलेली मला माहीतसुद्धा नव्हती. माझा पाय भरला तेव्हा कळले ग आई.”
आत्याबाई खाली गेल्या. हरदयाळांचीच ती बहीण ! भावाचा स्वभाव त्यांच्यातही उतरला होता. प्रेमळपणा, मनाचा मोठेपणा त्यांना ठाऊक नव्हता. आत्याबाई रघूला, मिठारामाला दोन-दोन जरदाळू देत, परंतु शशीला मात्र एकच मिळे. जेवताना शशीला तूप थोडे, दह्याचा एकच चमचा, परंतु रघू व मिठाराम यांना चार-चार चमचे मिळत. मिठाराम म्हणायचा, “आई, शशीला वाढ गं आणखी दही.” तर आत्या म्हणायची, “त्याला सारखे पडसे असते. त्याला कशाला दही ?”
एके दिवशी शशी नळावरून पाण्याचे तांब्ये भरून आणीत होता. बाहेर काळेख पडू लागला होता. नळाची मोरी कोणीच धूत नसे. मालक बेफिकीर व बि-हाडकरू भाडोत्री ! आपणच का धुवावी मारी ? असे प्रत्येकाला वाटे. मोरी अगदी बुळबुळीत झाली होती. शशीचा पाय घसरला व तो पडला. हातातील पाण्याचा तांब्या दणकन् खाली पडला. शशीला बरेच लागले. तांब्या पडल्याचा आवाज एकून आत्या बाहेर आली. “पाडलास ना तांब्या ? जसे काही खायला मिळत नाही भुताला ! तिन्ही त्रिकाळ गळगळ घाशी खातो-जेवतो तरी हातात शक्ती नाही ! जरा घट्ट धरायला काय झाले होते? केवढा हा खोमा पडला तांब्याला ! आण इकडे तो. एक दिवस तांब्ये भरून आण म्हणून सांगितले, तर दिलान तांब्या फेकून !” असे ओरडून शशीच्या पाठीत आत्याने एक रट्टा दिला. शशीची पाठ उघडी होती. तो आधीच अशक्त झालेला, वाग्बाणांनी जर्जर झालेला बाळ कळवळला ! शशीच्या ढोपराला लागून रक्त येत होते, तिकडे कोणाचे लक्षच नव्हते, शशी वर गेला व टेबलावरचा टिपकागद घेऊन ते रक्त टिपू लागला. चिंधी तरी कोठून आणणार ?
“अरे, बाबांचा टिपकागद काय घेतलास ? थांब मी आईला सांगतो,” असे म्हणून आगलाव्या रघुनाथ खाली आईला सांगता झाला. “अरे शश्या, पैसे पडतात तसल्या कागदाला. ते का फुकट मिळतात ? तुझा बाप देतो वाटते पैशांची थैली ?-” आत्या बोल बोलली. गरीब शशी बाहेर गेला. रस्त्यावरची चिमूटभर धूळ घेऊन त्याने जखमेवर घातली !