श्यामची आत्या 7
सीताआत्याचे ते वासरावरील प्रेम-पुत्रनिरपेक्ष प्रेम पाहून श्यामचे हळुवार व सहृदय मन भरून आले. सीताआत्यासारखीच्या दुःखी संसारातही सुखाचे क्षण जर कोणी निर्माण करीत असेल, तर ते वासरावरील प्रेमच होय. श्यामने त्या वासराला अंगणात हिंडवले; पाठीवर शेपटी घेऊन ते वासरू हरणाप्रमाणे उड्या मारू लागले. सीताआत्या दूरून त्याचे कौतुक करीतच होती, “कसा उड्या मारतो आहे! एवढासा आहे, पण फारच चपळ आहे, नाही? श्याम, काय रे, तुलासुद्धा आवरत नाही?” सीताआत्याचे वत्सस्तोत्र सुरू होते.
श्यामने हि-याला हिंडवून पुःन बांधून टाकले. तो सीताआत्याजवळ येऊन बसला. श्यामच्या धोतराला थोडी घाण लागली होती. सीताआत्याने ती पाहिली. ती त्याला म्हणाली, “श्याम, तुझ्या धोतराला घाण लागली रे! अगदी वेडा आहे हि-या.” श्याम म्हणाला, “आत्या, लहान मुले नाही का अंगावर हगतमुतत? थोडेसे शेण लागले धोतराला! त्यात काय बिघडले! लहानपणी श्रावणीच्या वेळेस आम्ही शेण अंगाला लावीत होतो व खातही होतो. आत्या, हि-या म्हणजे तुझे बाळच नाही का?”
एकाएकी सीताआत्याचे डोळे भरून आले! का बरे? तिला कसली तरी आठवण झाली; काहीतरी दुःखद विचार तिच्या मनात आला खास! ते पाहा, तिचे ओठ हालले. सीताआत्या सांगू लागली, “श्याम, देव तरी कोठे चांगला आहे? आज की नाही, येथे तुला कमीत कमी चार-पाच वासरे तरी दिसली असती; खोटे नाही सांगत, सारी मोरीची हो! तो पहिला पाडा होता. केवढा मोठा झाला होता. कसा दिसे राडबिंडा! त्याला जणू दृष्टी लागली आणि तो तिगस्ता वारला. कोणत्या बरे दिवशी-?” सीताआत्या आठवीत होती, इतक्यात रामचंद्रपंत आले. त्यांना तिने विचारले, “आठवते का हो तुम्हाला, रत्ना कोणत्या दिवशी गेली ते? तिगस्तीचा वैशाख, पण तिथी कोणती?” थांब सांगत्ये हो, एकादशी झाली नि दोन दिवसांनी बहुधा. हो वेशाख त्रयोदशी होती; दुस-या पंधारवड्यातील. श्याम, रत्ना कसा होता सांगू? पण देवाने नेमके त्यालाच उचलले. परंतु तेवढ्यानेही देवाला समाधान झाले नाही. यंदा पायलागाचा रोग आला. आणखी दोन वासरे मेली. मोरीच मरायची, पण जगली हो! किती काळजी घेत होतो आम्ही. वासरे येथे तडफडत, तर आम्हाला जेवणही नसे गोड लागत! आता तर एक हि-या तेवढा उरला आहे. देवाने असे का रे करावे? तू आता विद्वान आहेस, शिकला सवरला आहेस, तर सांग.” श्याम म्हणाला, “आत्या, देव करतो ते ब-यासाठीच असेल. त्याचे हेतू कोण जाणणार? आपण श्रद्धा ठेवावी झाले.” सीताआत्या म्हणाली, “कसली रे, ब-यासाठीच? आम्हाला का पोरेबाळे आहेत? ही गायीची वासरे हेच माझे सुख. न्यायचेच होते देवाला तर न्यायचे होते एखादे. पण आपली सगळीच न्यावी? हि-या, तू तरी उदंड आउक्षाचा हो, यशवंत हो. बघ, मान कशी वर करतो आहे! समजते हो त्याला सारे! काय रे पाहिजे लबाडा? सारा दिवसभर काय द्यायचे? हि-या, हां आधी नीट बघ, नीट बघ नाहीतर श्याम तुला चकणा म्हणेल हो!”
सीताआत्या त्या वासरांची कथा, घरातील मुलाबाळांची कथा सांगावी त्याप्रमाणे सांगत होती. “वासरू वारले!” असे ती म्हणाली. जणू मुलगाच वारला! त्याच्या मरणाची तिथी, मरणाचा वार सारे तिच्या लक्षात होते. ते सारे पाहून श्यामच्या मनावर काय परिणाम झाला ते कोण सांगणार?