विश्राम 6
म्हातारा शरमिंदा झाला. त्याच्यान काही बोलवेना. शेवटी तो म्हणाला, “विश्राम पोरा कुळाला बट्टा की रे लावलास! अरे, बापजाद्यांनी कधी कुणाच्या चिंधीला का काडीला, दोरीला सुद्धा नाही हात लावला. धनी दूध देतो म्हणून त्या दिवशी खोटे सांगितलेस, ते चोरीचे दूध मला आग्रह करून पाजलेस. त्यापेक्षा विष का नाही पाजलेस मला? सा-या गावात आता छी-थू होईल. मी मेल्यावर असे करायचे होतेस. आजारी पडून ती मेली असती तरी काय बिघडले असते? चोरी करून जगण्यापेक्षा मेलेले काय वाईट? कोठे फेडशील हे पाप? कष्टाचा कोंडा बरा. कष्टाचे मिळेल ते अमृत आहे. नसेल खायला तर धोंडे चघळावे, परंतु चोरी नको, दादा, पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. एवढी कृपा माझ्यावर करा. ह्या पांढ-या केसांची कीव करा, आणखी नका बेअब्रू करू. घरात या पोरीलाही धक्का बसेल.” असे म्हणून तो थोर म्हातारा त्या कृपणाच्या पाया पडला.
दिनकरराव म्हणाले, “बरे, एक वेळ सोडतो. परंतु आमच्या घरी उद्यापासून विश्राम कामाला नको. हे विकत सर्प कशाला घ्यायचे?” असे म्हणून दिनकरराव काठी आपटीत निघाले.
विश्राम अंगणात रडत होता. ओसरीवर म्हातारा संचित होता. सगुणा घरात रडत होती. दिनकरराव घरी जात होते. बाहेर अंधार होता. दगडावर काठीचा आवाज करीत दिनकरराव घरी जात होते. तोच फो आवाज झाला. भयंकर सर्प! दिनकररावांना कडाडून चावा घेतला त्याने. “अरे साप चावला, साप चावला, धावा रे-” दिनकरराव ओरडले. लोक हातात कंदील व काठ्या घेऊन धावत आले. काही लोक सापाला शोधू लागले. काहींनी दिनकररावांना उचलून विश्रामच्या अंगणात नेले. साप काही सापडला नाही. दिनकरराव विव्हळत होते. औषधासाठी धावपळ सुरू झाली. कोणी म्हणे, कोंबडी लावा. इतक्यात विश्रामच्या मनात एकाएकी काय आले कोणास माहीत! तो एकदम काही तरी निश्चय करून उठला. तो दिनकररावांचा पाय नीट पाहू लागला. विश्राम खाली वाकला; जेथे सर्पाने दंश केला होता तेथे त्याने एकदम जीभ लावली व तो विष चोखून घेऊ लागला.
म्हातारा ओरडला, “अरे, हे काय पोरा? अरे मरशील!”
विश्राम म्हणाला, “कुळाला लागलेला डाग तरी धुऊन निघेल. पापाचे हे प्रायश्चित्त. यांचे पावशेर दूध घेतले, यांना पै किंमतीचे प्राण देतो.”
विश्राम सारखे विष चोखून घेत होता, थुंकत होता. दिनकररावांचे विव्हळणे थांबेपर्यंत त्याने असे केले. विश्रामच्या पोटात विष गेले की काय? त्याचा ओठ थोडा फुटला होता. तेथे लागले की काय विष? तो पाहा, विश्राम एकदम घेरी येऊन पडला.
सगुणेने गायीसारखा हंबरठा फोडला! म्हातारा विश्रामजवळ बसून कपाळाला हात लावून मुलासारखा रडू लागला. इतक्यात दिनकररावांच्या घरची मंडळी डोली घेऊन तेथे आली. दिनकररावांना डोलीत घालून घरी नेण्यात आले. त्यांना जरा बरे वाटू लागले होते.