शशी 1
“शशी ! शाळेत नाही का जायचे ? इतर मुले केव्हाच गेली. तू तेथे झाडाखाली बसून काय करीत आहेस ?” असे हरदयाळांनी रागाने विचारले.
शशी प्रेमळपणाने म्हणाला, “बाबा ! मी पाखरांची किलबिल एकतो आहे. पाखरांचा आवाज किती गोड असतो ! बाबा, तो लखू पेटी वाजवितो, त्यापेक्षा मला पाखरांची गाणी आवडतात. आजच्या दिवस मी शाळेत नाही गेलो, तर नाही का चालणार? बाबा !माझा जीव शाळेत गुदमरतो. रडकुंडीस येतो ! बाबा, शिकण्यासाठी का शाळेतच जावे लागते ? या पाखरांना नाही कोणी शाळेत घालीत ते ? आणि नदीकाठच्या त्या वनात सुंदर मोर आहेत, त्यांना तरी कोण शाळेत घालते ? बाबा ! मला नको ती शाळा. मला ती मुळीच आवडत नाही.”
“अरे, पण दगडोबा का व्हायचे आहे तुला ? विद्या नको का ? माणसाचा जन्म घेतला आहेस, शिकायला नको ? लिहिणे-वाचणे ज्याला येत नाही तो का मनुष्य ? तो तर पशू ! उठ, नीघ-”पुनःबाप ओरडून म्हणाला.
“मग ही पाखरे का वाईट आहेत ? आणि त्या मुंग्या- त्या पाहा कशा रांगेने नीट चालल्या आहेत. इकडून येणारी तिकडून येणारीच्या तोंडाला लागते, निरोप देते. निघून जाते. त्या दिवसभर काम करीत असतात. त्या मुंग्या का वाईट आहेत ? माणसे लिहा-वाचावयास शिकली म्हणजे का चांगली होतात ? आमचे मास्तर- ते का चांगले आहेत ? ते तर मारतात. शिव्या देतात. बाबा ! चांगले म्हणजे काय हो ? मी का वाईट आहे ? मी चांगला नाही ? आपल्या गायीचे वासरू गायीजवळ जाते अन् गाय त्याला चाटते. मी परवा आईजवळ गेलो आणि तिला म्हटले, ‘आई ! मला चाट.’ म्हणून मी का वाईट ? ते वासरू गायीस ढुशा देते तशा मी आईला देतो, मी वाईट ? कधी पडसे झाले म्हणजे माझ्या नाकास शेंबूड येतो, म्हणून का मी वाईट ? बाबा ! मला तर झाडावर चढता येते. पाखरांची घरटी कोठे असतात ते मला माहीत आहे. मासे नदीत कसे नाचतात ते मी पाहात बसतो. मुंग्या माझ्याशी बोलतात. फुलपाखरांबरोबर मी धावतो. फुलपाखरे किती रंगाची असतात, ते तुम्ही तरी सांगाल का बाबा ?” शशी जरा अभिमानाने म्हणाला.
“मला तुझ्याजवळ बोलायला वेळ नाही. वात्रट पोर ! जा शाळेत. हा शाळेत गेला नाही, तर संध्याकाळी याला घरात घेऊ नकोस, ऐकलेस का गं ? शश्या ! बघतोस काय गाढवा ? घे पाटीदप्तर. पेन्सिल आहे की नाही ? रोज पेन्सिल हरवतो कारटा. काल पेन्सिल दिली, ती हरवली असशील तर पाठीचीच पेन्सिल काढीन-” हरदयाळांचा क्रोध वाढत चालला.
शशी काकुळतीने म्हणाला, “बाबा ! शाळेत मास्तर मारतात, घरी तुम्ही मारता. जाऊ तरी कुठे मी ?”
“मसणात जा ! विधुळा पोर ! आण पाटीदप्तर ! बघू दे, पेन्सिल आहे का ?” असे म्हणून हरदयाळ शशीचे दप्तर पाहू लागले.