विश्राम 5
विश्रामच्या पाठोपाठ तो पाहा कृष्णसर्प जात आहे. काही अंतरावर विश्राम गेला तोच दिनकररावांनी त्याला गाठले. सर्पाप्रमाणे फुत्कार करून त्यांनी विश्रामला पकडले, “हरामखोर! कोठे रे चाललास दूध घेऊन? रोज आम्हाला असे लुटतोस तू चोरा! चांगला आहे उद्योग! आम्ही म्हणत होतो, ‘विश्राम गरीब आहे;’ परंतु तू तर बिलंदर. तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो, चल.”
धनीसाहेब, “माझी बायको आजारी आहे, म्हणून हे थोडे दूध नेत आहे. आजचा चौथा दिवस. सात दिवस ओषध द्यावयाचे आहे. तिचे डोके फार दुखते. काय करावे गरिबांनी! चोरी करावी, लुबाडावे हा हेतू नाही. तुमच्याच घरातला नाही का मी? दिवसभर तुमच्या घरी नाही का राबत? मी का परका आहे?” विश्राम गयावया करून म्हणाला.
धनी संतापाने म्हणाला, “चांगला आहे न्याय म्हणे, गरिबांनी काय करावं? आणि आम्ही रे काय करावे? त्या लहान रामाला दूध लागते, रंगुला द्यावे लागते, तिला लापशीसाठी लागते- आमच्या घरीच पोराबाळांना पुरत नाही तर तुला कोठून द्यावयाचे? चोर ते चोर, पुन्हा शिरजोर! तुला मी पोलिसांच्याच ताब्यात देतो. लाज नाही रे वाटत बोलायला? पण चल, आधी तुझ्या बापाकडेच चल. त्या म्हाता-याला सांगतो, की बघ तुझा पोरगा. हो पुढे चोरा!”
विश्राम खिन्नपणे चालू लागला, त्याच्या पाठोपाठ हातात काठी घेतलेले दिनकराव चालू लागले. विश्राम अजून घरी का आला नाही म्हणून म्हातारा वाट पाहात होता. सगुणाही संचित बसली होती. म्हातारा सगुणेला म्हणाला, “आज पोराला बरीच रात्र झाली.” सगुणा म्हणाली,” त्यांच्याकडे कामच भारी दिवस बैलासारखा राबवितात.”
“हो, बैलवाणी राबवितो उद्या पासून नकोच राबायला. अशा चोराला कोण कामावर ठेवणार दिनकरराव अंगणात येऊन ओरडले. म्हातारा चकित झाला. तो म्हणाला, पोरी, घोंगडी पसर ती. या बसा. आता रातचे कोणीकडे?"
“घोंगडी वगैरे काही नको. तुझा मुलगा विश्राम चोर आहे. तो रोज दूध चोरून आणतो, तरी काही तू मला सांगितले नाहीस. आणि तूही म्हाता-या, या चोरीत सामील झालास वाटते? ही पाहा भरलेली लोटी. मुद्देमाल. सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत या. आज याने दूध चोरले. ते पचू लागले म्हणजे उद्या आमच्या पोराबाळांच्या अंगा-खांद्यावरचेही लांबवायचा हा! याला पोलिसांच्या ताब्यात देतो-” दिनकरराव ऐटीत उभे राहून बोलत होते, शेजारचे लोकही जमा झाले.
विश्राम मान खाली घालून उभा होता. सगुणा घरात जाऊन रडू लागली. “हे सारे माझ्यामुळे झाले. कपाळ दुखते असे मी सांगितले नसते तर?” असे मनात म्हणून ती जिवाला लावून घेती झाली.