मोलकरीण 25
मालती एकदम जागी झाली. “निजा बाईसाहेब, झोपले आहेत ते शांत.” राधाबाई म्हणाल्या. “राधाबाई, आता तुम्हीच झोपा थोड्या. मग पुनः मी तुम्हाला उठवीन.” मालती म्हणाली. “बाईसाहेब, माझ्या वेडीच्या मनात आपला एक विचार आला, सांगू का ?” असे राधाबाईंनी विचारले. मालती म्हणाली, “सांगा.” “कोकणात की नाही, राजापुरजवळच्या एका खेड्यात देवी आहे, तिची खणा-नारळांनी ओटी भरून, म्हणून प्रार्थना करा.” राधाबाईंनी सांगितले. “तिकडेच यांचे गाव आहे. यांच्या गावचीच तर नव्हे ना ती देवी ? असेल, काही चूक झाली असेल.” असे म्हणून मालतीने हात जोडले. “आई जगदंबे, मुलीला चूडेदान दे. त्यांना बर वाटू दे. तुझी १०८ खणा-नारळींनी ओटी भरीन आणि ते गोरगरिबांना वाटून टाकीन. आमचे अपराध क्षमा कर. चुकलेल्या मुलांना पदरात घे.” अशी मालतीने देवीची प्रार्थना केली.
“राधाबाई, खरेच पडा जरा तुम्ही. तेथेच त्या चटईवर पडा,” मालती म्हणाली. “नाही, बाईसाहेब, तुम्हीच पडा. मला म्हातारीला झोप येते कुठे ? दिनेशही कदाचित उठेल, त्याला आंदुळावे लागेल. निजा तुम्हालाही बरे वाटत नाही- तुमचेसुद्धा अंग जरा कोमट, कढत लागते आहे. निजा हो. लेकुरवाळ्या तुम्ही, निजा, संकोच नको.” राधाबाईंनी मालतीना प्रेमाने निजावयास लाविले.
पहाटेची वेळ होत आली होती, दूर कोंबडा आरवत होता, सूर्य येणार, अंधारातून उषा येणार, अशी हृदयातील अमर आशा तो कोंबडा बोलून दाखवीत होता. ते पाहा, राधाबाईंच्या डोळ्यातून पाणी येत आहे. अश्रूंची जपमाळच जणू त्या जपत आहेत ! त्यांना का पतीची आठवण झाली ? स्वतःच्या स्थितीबद्दल का त्यांना वाईट वाटत होते ? मुलगा जवळ असून त्याच्याजवळ बसता येत नाही, त्याचे डोके मांडीवर घेता येत नाही, म्हणून का त्यांना भडभडून येत होते ! का त्या देवाला आळवीत होत्या ! हातात जपमाळ, डोळ्यांतून अश्रूंची माळ ! बाहेर दवबिंदू टपटप करीत होते. मंद वारा खिडकीतून येत होता. खिडक्या उघड्या होत्या. आकाशातील सारे तारे अजून दिसत होते. अजून चार घटका रात्र होती. ते पहा श्रवण नक्षत्र. आईबापांना कावडीत घालून नेणारा तो पुत्र. तो पितृभक्त पुत्र आकाशात दिसत आहे. लहानपणी गोविंदभटजी बाळाला नक्षत्रे दाखवीत असत. श्रवण नक्षत्र दाखवून रामायणातील ती गोष्ट ते सांगत. बाळासाहेब अंथरुणात जागे होते व खिडकीतून बाहेर पाहात होते. त्या श्रवण नक्षत्राकडे का ते पाहात होते ?
त्यांना स्वतःचे वडील आठवले, बाळपण आठवले, मातृपितृभक्तीचे पवित्र स्मरण झाले. आंधळ्या आईबापांना कावडीत घालून, त्यांना तीर्थयात्रा घडविणारा तो श्रवण या भरतभूमीत झाला व मदांध होऊन आईबापांस हाकलून देणारा पापी करंटा मी-मीही या भरतभूमीतलाच ! हिरा व गारगोटी एकत्र सापडतात. बाळासाहेबांच्या डोळ्यांत ता-यांसारखे अश्रू चमकले. समोर चटईवर बसलेली प्रशान्त पावन मातृमूर्ती दिसली ! हातांत माळ आहे, डोळे मिटलेले आहेत, अश्रू घळघळत आहेत. अशी ती बाळाची आई होती ! ती बाळासाठी जप करीत होती, पहारा करीत होती, मृत्यूला येऊ देत नव्हती. बाळाची आई लहानपणी लोणी-साखर देणारी, गुरगुट्या भात करून त्यात तोंडली घालून बाळाला जेवू घालणारी, त्याला देवीचा अंगारा पाठविणारी, नारळीपाकाच्या वड्या खाऊ म्हणून पाठविणारी, ‘बाळ, तू दूध पीत जा हो ! आमचे कसे तरी होईल,’ असे सांगणारी, बाळाचे शर्ट धुणारी, बाबा रागावले तर बाळाची बाजू घेणारी, अशी ती आई-प्रेममूर्ती आई, बाळाची सध्या मोलकरीण झालेली आई-त्या आईकडे बाळ पाहात होता. बाळ सद्गदित झाला होता. बाळासाहेब बाळ झाले. रात्र संपत आली. ते पहा, बाळासाहेब उठू पाहत आहेत. क्षीण झालेले बाळासाहेब उठू पाहात आहेत, ते पाहा उठले, गादीवर बसले. आवाज नाही, काही नाही. सारे शांत ! तो पाहा ‘कुकूकू.’ कोंबडा आरवला. ‘अंधारातून प्रकाश येणार, निशा संपून उषा येणार’ असे सांगत आहे. बाळ उठला, पलंगावरून खाली उतरला. स्तब्ध-शांत !