शशी 14
“बायकांसारख्या ओव्या काय म्हणतोस ? परवचा म्हण. ते जानेवारी-फेब्रुवारी, तिथी, नक्षत्रे सारे म्हण.” पार्वतीबाई घरात येऊन म्हणाल्या. “आई, मला ओव्या आवडतात. तू मधूला आंदुळताना म्हणतेस, मग मी का ग नको ?” शशीने विचारले. “अरे तू का मुलगी आहेस .” पार्वतीबाई म्हणाल्या. “मुली, शाळेत येऊन आमच्या पुस्तकातील कविता म्हणतात, मग त्यांच्या ओव्या मी म्हटल्या म्हणून काय झाले ?” शशीने विचारले.
पाळण्यात मधू रडू लागला. पार्वतीबाईंनी त्याला प्यायला घेतले.
“आई मधू रडू लागलाच तू त्याला प्यायला घेतलेस. वासराला मात्र बांधून ठेवलेस. देवाला हे आवडेल का गं ? देव दयाळू ना आहे ?” शशीचे प्रश्न सुरूच होते.
“पुरे कर रे. तुझी टकळी सारखी सुरू असते. आता घरी येतील अन् विचारतील की परवचा झाला का ? मग लागशील मुळूमुळू रडायला. म्हण ती पावकी, अकरकी.” पार्वतीबाईंनी जरा रागाने सांगितले.
शशी परवचा म्हणू लागला. तो हलक्या आवाजाने म्हणत होता. “जरा मोठ्याने म्हण. नाही तर इतर वेळा कसा मोठ्याने ओरडतोस? या वेळेस मात्र आवाज बसतो गुलामाचा! ऊठ, उभा रहा. त्या भिंतीजवळ हात जोडून उभा राहा आणि चांगला मोठ्याने परवचा म्हण. मला तिकडे गोठ्यात ऐकू आला पाहिजे.” हरदयाळ बाहेरून घरात येताच शशीवर ताशेरा झाडू लागले.
पार्वतीबाईं म्हणाल्या, “आज गोठ्यात नको जायला! सारे दूध वासरू प्यायले. ह्याला सांगितले, की गाय बांध तर नुसता पाहात राहिला!”
“तू तरी या पोरावर काम का ढकलतेस? तुला त्याची अक्कल माहीत नाही? थोडे बघतो दूध देते का.” असे म्हणून हरदयाळ दुधाचा लोटा घेऊन गोठ्यात गेले.
मधू रांगत होता, शशी त्याच्याबरोबर खेळत होता. त्याचा परवचा संपला होता. मधूबरोबर शशी पण घोडागाडी करू लागला. हरदयाळ घरात आले. “लहान आहेस का आता त्याच्याबरोबर खेळायला? कुकुले बाळ की नाही तू! श्लोक, स्तोत्रे म्हटलेस का सारे?” हरदयाळांनी विचारले. “मला नाही ते श्लोक आवडत. आई म्हणते त्या ओव्या मला आवडतात. त्या मला लवकर पाठ होतात. पाठ न करता पाठ होतात.” शशी म्हणाला. “अरे, मग परकर नेस. हातात बांगड्या घाल. म्हणे ओव्या आवडतात! चल ऊठ, मी शिकवितो श्लोक. म्हण, तो गुरु, तो गुरुनंदन, तो कृप, तो कर्ण, तो पितामह रे-’ म्हण उघड तोंड.” हरदयाळ संतापले.
शशी म्हणू लागला, “तो गुरुनंदन, तो कर्ण हराम रे-” “अरे, गद्ध्या हराम नव्हे, पितामह रे-” हरदयाळ ओरडले.
“बाबा, दुसरी गाणी शिकवा ना हो? हे श्लोक मला नाही आवडत.” शशी म्हणाला.