Get it on Google Play
Download on the App Store

मोलकरीण 18

“देशबंधू दासांच्या वासंतीदेवी, त्या गेल्या का कोमेजून ? लक्षाधीशाची पत्नी, परंतु क्षणात घोंगडीवर निजू लागली. मी सुद्धा कष्ट सहन करीन. कोणत्याही परिस्थितीत मी सुखाने राहीन. मी सांगू का अलीकडे माझी मनोवृत्ती निराळी होऊ लागली आहे. दिनेशच्या बाळंतपणापासून काही तरी निराळेच वाटते. त्या राधाबाईंचा हातगुण की काय कोणास कळे ! त्या मला स्वतः लापशी करून देतात. लाडू करून देतात. त्यांच्या हातच्या खाण्यात जादू आहे की काय न कळे ! काही असो; मी अलीकडे जास्त प्रेमळ अन् मायाळू झाले आहे खास. माझा अभिमान, माझा ताठा कमी झाला आहे. परवाचीच गोष्ट. खंडूने काचेची बरणी फोडली, तर मी अगदी रागावणार होते. परंतु राधाबाई जवळच होत्या. त्या एकदम खंडूला म्हणाल्या, ‘फुटू दे हो, खंडू ! बाईसाहेब काही रागावणार नाहीत. अरे मुद्दाम थोडीच कोणी फोडील ? पाय घसरला, तू तरी काय करणार ? ते तुकडे मात्र नीट उचल. पोरेबाळे हिंडतात. नाही तर थांब मीच ते बारीक तुकडे शेणगोळ्याला टिपून घेते,’ असे म्हणून त्यांनी खरेच शेणगोळ्याला टिपून घेतले ते कण. मला खंडूला रागे भरता आले नाही. मी लाजले. परंतु ते जाऊ दे. मग सांगा ना सोडता का ही नोकरी ? ठरवा-” मालतीने पतीचा हात हातात घेऊन प्रेमाने विचारले. त्या दिवशी गोष्टी तेवढ्याच झाल्या.
तो रविवारचा दिवस होता. सकाळची ८।।-९ ची वेळ होती. मालती व बाळासाहेब बुद्धिबळे खेळत होती; तो खाली अंगणात कोणी तैलंगी ब्राह्मण आला. “ए भटा चालता हो. येथे का दक्षिणा मिळवायला आलास ? येथे साहेब राहतात, नीघ.” खंडू ओरडला, मोत्या भुंकू लागला. तो तैलंगी ब्राह्मण चिवट होता. “दूरचा ब्राह्मण. वेद म्हणतो. यजमान वर दिसतात-” वगैरे तो बालू लागला. बाळासाहेब गॅलरीत आले व म्हणाले, “खंडू येऊ दे त्यांना. वर घेऊन ये.”  “हो साब. या, या हो असे.” खंडू त्या तैलंग्यास घेऊन वर आला.

तो वेदोनारायण बैठकीच्या अगदी टोकाला भीत भीत बसला. बाईसाहेब खंडूला म्हणाले, “खालचा पाट घेऊन ये रे चटकन्.” खंडू धावत गेला व पाट घेऊन आला. बाळासाहेब म्हणाले, “बसा पाटावर. की खुर्चीवर बसता ?” ब्राह्मण म्हणाला, “वेदाला खुर्ची नको. वेद पवित्र आहे, पाटावर ठीक आहे.”

तो ब्राह्मण वेदमंत्र म्हणू लागला.
या आपो दिव्या उत या स्वयंजः
या आपो वहन्ति उत या खनित्रिमाः।।


बाळासाहेब म्हणाले, “जटापाठ, घनपाठ यांतील काही म्हणा.”
तैलंगी ब्राह्मण म्हणाला, आपण जाणता ? थोर आहा आपण. वेद पवित्र. तुम्ही साहेब, तरीही जाणता-” असे बोलून तो घनपाठ, जटापाठ म्हणू लागलाः

चैत्रं वैशाखं-वैशाखं चैत्रं-चैत्रं-वैशाखं ज्येष्ठम्
वैशाखं ज्येष्टं-ज्येष्टं वैशाखं-वैशाखं ज्येष्ठ आषाढम्
यज्ञमयजन्त सयजन्त यज्ञम्.....


मंत्र म्हणता म्हणता तो ब्राम्हण असा तेजस्वी दिसत होता की, बाळासाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांनी ब्राह्मणाच्या हातावर पंचवीस रुपये ठेविले व त्याला नमस्कार केला. “आयुष्यमान् भवतु ! शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, श्रीरस्तु, धीरस्तु, आयष्यमस्तु, मंगलमस्तु!” असे शत आशीर्वाद देत तो ब्राह्मण आनंदून निघून गेला.

विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29