शशी 5
शशीजवळ पेन्सिल नव्हती. तो कशाने लिहिणार ? पायांजवळची जमीन नखांनी खरडून त्याने एक लहानसा दगड काढला व त्यानेच तो लिहू लागला. मास्तर शशीजवळ आले व पाहू लागले.
“शश्या ! अरे कशाने लिहीतो आहेस ?” तुला वेड लागले की काय? अरे, पाटी सारी चरबरीत झाली. हे कायमचे शुद्धलेखन झाले-” ते म्हणाले.
“मग आता पुनः लिहायला नको मला? हे कायमचे राहील, मास्तर?” शशीने विचारले.
“काय मूर्ख आहे! तुझ्याजवळ पेन्सिल नाही का? शाळेत तरी कशाला येतोस? भीक माग. द्या रे याला कोणी पेन्सिल द्या. लहानसा तुक़डा-” मास्तर म्हणाले.
अमीन पेन्सिल पुढे घेऊन आला. त्याने पेन्सिलचे दोन तुकडे केले व एक शशीला दिला. शशी घेत नव्हता. अमीन प्रेमाने म्हणाला, “घेरे शशी, ही तुझीच पेन्सिल. घे रे.”
“घे तो तुकडा. भिकारी तो भिकारी आणि पुनः अभिमानी! लाग लिहावयास-” असे बजावून मास्तर शुद्धलेखन सांगू लागले.
“त्या आंब्याच्या झाडावर किती तरी आंबे आले होते- आंबे आले होते.”
आंबे काय झाले-आंबे, पुढे काय!” मुले विचारू लागली.
“अरे, आले होते-” गुरुजी रागाने ओरडले.
एक मुलगा ‘अरे’ शब्द लिहू लागला.
“अरे, ‘अरे’ काय लिहितोस? आले होते; ‘आले होते’ लिही,” मास्तरांनी सांगितले.
“आले होते हे दोनदा लिहावयाचे? मी एकदाच लिहिले आहे, ” शशीने गोड आवाजात विचारले.
“डोंबल तुझं! काय शिंची कारटी आहेत! सांगत नाही. पुढे घ्या-”असे म्हणून मास्तर पुढे आणखी सांगू लागले.
“त्या आंब्यातील काही शेंदरी, काही पिवळे, काही राते, काही लाल असे दिसत होते! उद्गारचिन्ह.”