शशी 4
मास्तरांनी नरसिंहाचा अवतार धारण केला.
थरथरत शशी मास्तरांजवळ येऊन उभा राहिला. त्यांनी त्याचे डोके धरले;ते डोके एकदा भिंतीवर आपटीत व मग पुढे टेबलावर आपटीत.
शशी मोठ्याने रडू लागला. तिकडे अमीनच्या डोळ्यांत पाणी आले. लखू व गोविंदा मात्र हसत होते.
शिक्षा झाली. शशी जागेवर गेला. देवासमोर नारळ फुटला ! पुढे वाचन सुरू झाले. वाचनात वनराजी शब्द आला. मास्तरांनी विचारले, “वनराजी म्हणजे काय ?” कोणी काही सांगेना.
“ढ आहेत सारी कारटी ! अरे वन म्हणजे काय ?” त्यांनी विचारले “राम वनात गेला होता, ते वन,” शशीने उत्तर दिले.
“राम वनात गेला होता ! तू का नाही जात गाढवा ?” हसत मास्तरांनी विचारले.
शशी म्हणाला , “हो मीसुद्धा जातो. तेथे मोर असतात. त्यांचा पिसारा किती छान दिसतो ! मी सुट्टीच्या दिवशी जातो तेथे.”
मास्तर शब्दार्थ सांगू लागले, “वन म्हणजे झाडांचा समुदाय. लिहून घ्या सारे. ए सोम्या. फळांवर लिही रे. तो फळा पुसुन टाक आधी नीट. लागला तसेच लिहावयास. अरे झ- ‘ज’ नव्हे; डांचा... ‘डा’ वर अनुस्वार दे, समुदाय ‘मु’-हस्व काढ. थोबाडीत पाहिजे वाटते ? हं जाग्यावर. आता राजी म्हणजे काय ? तू रे बद्री?”
“राजी म्हणजे राजी. आजा-आजी, राजा राणी. राजाची बायको ती राजी-” बद्री म्हणाला.
“बरोबर. हुशार आहेस तू. मारवाड्याची मुले हुशार असतात. वनराजी म्हणजे नवाची राणी. समजले ना... !” मास्तर विचारू लागले.
एक मुलगा एकदम म्हणाला, “मास्तर वाचनाचा तास आता संपला. पुढचा शुद्धलेखनाचा आहे. शुद्धलेखन घाला.”
“घ्या शुद्धलेखन. तोंडे फिरवा, पाट्या घ्या. एकमेकांचे पाहिलेत तर याद राखा. थोबाडच रंगवीन. पाठ मऊ करीन. शश्या, बस आता खाली. घे लवकर पाटी!”- गुरुदेवांनी आज्ञा केली.
गुरुदेव मोठ्या कष्टाने खुर्चीवरून उठले. तोंडाने शुद्धलेखन सांगत ते मुलांमधून हिंडू लागले. मध्येच एखाद्या पाठीवर छडी वाजे.