मोलकरीण 23
दारात मोटार आली. डॉक्टर आले. मालतीने डोळे पदरानेच पुनः नीट पुसले. तेथे खंडीभर रुमाल होते, पण ती पदरानेच पतीचे डोळे पुशीत होती. निरहंकारी प्रेम ती शिकू लागली, प्रेमातील छटा समजू लागली.
“डॉक्टर! सारखे रडतात हो हे अगदी. काय वेदना होतात कळत नाही. पुसले. काय चिंता कळत नाही. शांत पडून राहतील, डोके शांत राहील, असे द्या ना काही औषध-” मालती डॉक्टरांना सांगत होती.
“बाळासाहेब, कोठे दुखते आहे? विशेष का काही दुखते?” नळीने तपासता तपासता डॉक्टर विचारीत होते. हृदयाचे दुःख त्या नळीला काय कळणार? “तसे काही दुखत नाही, लहानपणाच्या आठवणी सारख्या मनासमोर येऊन वाईट वाटत होते.” बाळासाहेब म्हणाले.
खंडू औषध घेऊन आला. “करा आ-” मालतीने सांगितले. “माले, मला नको गं औषध. हे ब्रोमाईड आहे. गुंगी आणणारे औषध! जागृत होणा-या जीवनाला, मालती, पुनः कशाला झोपवतेस! ते रडू दे, मला पोटभर रडू दे. हे रडणे मला शुद्ध करीत आहे. आईचे दर्शन घ्यावयाला, तिचे पाय पाहावयाला हे अश्रू मला योग्य करीत आहेत. त्या डॉक्टरला हे कसे समजणार? या अश्रूंचे मोल कोण करणार? यांचे निदान कोण करणार? देवासाठी रडणा-या ध्रुवाचे अश्रू एक प्रल्हादच जाणतील. तळमळणा-या तुकारामाचे अश्रू तुळशीदासच जाणतील. महात्माजींचे अश्रू गुरुदेव रवींद्रनाथ जाणतील! आईला भेटण्यासाठी तळमळणा-या जीवाचे अश्रू, मालती, ते तू का पुसू इच्छितेस! माझे पापपर्वत हे अश्रू वाहवून नेत आहेत. शुद्ध होत आहे माझे जीवन! हे आश्रू ढाळून डोळे कदाचित कोरडे होतील, परंतु हृदय प्रेमरसाने, कृतज्ञतेने, नवजीवनाने भरभरून येईल. हृदयात प्रेमपूर उसळतील. प्रेममंदाकिनी वाहेल, मालती, नको ग तो डोस! नका ते विष, मुकाट्याने मला पडू दे आणि या उशीवर रडू दे. ही उशी जणू माझ्या आईची मांडी अशी कल्पना मी करतो अन् रडतो. मालती, मला रडू दे आणि माझ्याबरोबर तूही रड.” असे म्हणता
म्हणता बाळासाहेबांचे डोळे भरून आले.
“तुम्हाला आमची दयाच नाही. आमच्यासाठी तरी घ्या ना औषध. असे काय बरे! घ्या. डोक्याला बरे वाटेल. करा, आ करा-” मालतीने प्रेमाच्या काकुळतीने विनविले. बाळासाहेबांनी आ केला, शांतपणे आ केला. मालतीने औषध दिले. “ही घ्या वर मोसंब्याची फोड,” असे म्हणून अंगावरचे पांघरुण नीट सरसावून मालती खाली गेली.
राधाबाई दिनेशला खेळवीत होत्या. “आणा त्याला. घेत्ये जरा. ये रे राजा.” मालतीने दिनेशला प्यायला घेतले. “रडू नको हो राजा आता इवलासुद्धा. तोतो कर आणि पाळण्यात झोप. रडून त्यांची झोप नको हो मो़डू. पाहा जांभया देत आहे. राधाबाई न्हाऊ घालून याला निजवा.” मालती म्हणाली. राधाबाईंनी विचारले, “बरे वाटते का आता? डॉक्टर काय म्हणाले? झोप लागली आहे का?” मालती म्हणाली, “डॉक्टराने झोपेचे औषध दिले आहे. पण औषध मुळी घेतच ना. आजारी माणूस म्हणजे हट्टी मुलासारखेच असते. गोड गोड बोलून दिले. झोप लागेल आता. मुलांना अगदी रडवू नका. जेवायचे झाले का चिमणाबाई?”