शशी 20
शशी बाहेर गेला, अमीनचे घर त्याला बंद होते ! त्याला कोण मित्र होते ? मांजरांची पिले, गायीचे वासरू, रानातले मोर, नदीतले मासे, हेच त्याचे मित्र ! शशी नदीकाठी जावयास निघाला, शीळ घालीत घालीत तो चालला. नदीतीरावरच्या राईत तो उभा राहिला. जणू तो वनदेवतेचाच बाळ होता ! एका झाडावरून त्याच्या डोक्यावर फुले पडली. देवांनी का त्या बाळराजावर पुष्पवृष्टी केली?
हिंडता हिंडता शशी एकदम थांबला. एक लहानसे पाखरू तेथे पडले होते. ते अद्याप जिवंत होते. त्याचा पंख दुखावला होता. शशीने आपला सदरा काढला व त्यात ते पिलू उचलून घेतले. त्या पिलाला घेऊन शशी घरी आला.
आई : अरे, असा उघडाबंब होऊन काय आलास? तुझा सदरा कुठे आहे? तुला वेड लागले की काय?
शशी : आई, आई! हे बघ, लहानसे पाखरू. रानात पडले होते ते. मी त्याला उचलून आणले आहे. बघ ग कसे आहे! आपण याला पाळू.
आई : कुठे आहे पाखरू, पाहू? भिरकावून देत्ये. तुला गायीची वासरे हवी. मांजरांची पिले हवी. आणखी ही पाखरेसुद्धा का?
शशी त्या पाखराला घेऊन पळत अमीनच्या घरी आला.
शशी : अमीन, अमीन, हे बघ चिमणे पाखरू!
अमीन : अरेरे, हे मरेल का रे?
शशी : अमीन, तुझ्याकडो मागे एक पिंजरा होता ना ? त्यात हे आपण ठेवू. वाचेल ते. आपण कापसाची मऊ गादी करू.
दोघा मित्रांनी ते पाखरू कापसाच्या गादीवर ठेवले. शशी, घरी रागावतील म्हणून, निघून गेला. ते पाखरू वाचले. अधूनमधून चोरून अमीनच्या घरी येई व ते पाखरू पाही. शशी आलेला पाहताच ते पाखरू शीळ घाली. जणू त्यांची पूर्वजन्मीची ओळख होती ! पूर्वजन्मीची नसली तरी या जन्मीची होतीच. कृतज्ञता हा गुण परमेश्वराने सर्वत्र ठेवला आहे.
पावसाळा जवळ येत चालला होता. मुंग्या फाऱ जोराने काम करीत होत्या. त्या दिवशी शशीच्या घरात मुंग्यांची रांगच्या रांग लागली होती.
शशी : आई ! या बघ किती मुंग्या, पाऊस येणार म्हणून का त्या गर्दी करीत आहेत ? त्यांच्या तोंडात ते पांढरे पांढरे काय
आहे ? ती काय अंडी आहेत ? कशा अगदी रांगेने जात आहेत ?
आई : त्या मुंग्याकडे काय पाहात बसलास ? त्या मधूला आधी उचल. डसतील नाहीतर त्याला. दोनदा झाडून टाकल्या तरी फिरून मेल्या आल्याच. सतावले बाई या मुंग्यांनी भारीच !