शशी 11
इतक्यात हरदयाळ तणतणतच बाहेरून आले. “कारटा कोठे गेला, काही पत्ता नाही. त्या मुसंड्याकडे गेलो, तो त्याची बायको म्हणाली, ‘आत्ताच पोराला घेऊन गेले.’ पोराला पळवायचे सुद्धा हे !” असे म्हणत ते ओसरी चढले, तो तेथे दादू पिंजारी होता. दादू पिंजा-याला पाहून ते चमकले.
“हरदयाळ, सारेच मुसलमान का वाईट असतात ? का आम्हाला ‘मुसंडे’,’मुसंडे’ म्हणता ? मुलाला ‘दगड,दगड’असे म्हटले तर तो खरोखरच दगड होतो. मुसलमानांना तुम्ही नेहमी ‘वाईट, वाईट’असेच म्हणाल तर ते खरोखरच वाईट होतील. जगातील चाळीस कोटी मुसलमान ईश्वराने का पै किंमतीचे निर्माण केले ? हरदयाळ ! भलेबुरे लोक प्रत्येक समाजात आहेत. बरे, ते जाऊ दे. मी तुमच्या मुलाला आणले आहे. त्याला पेन्सिल घेऊन दिली आहे. आता त्याला रागे भरू नका. त्याला मारूबिरू नका. आम्हा मुसलमानांना तुम्ही दुष्ट म्हणता, परंतु पोराच्या अंगाला आमच्याच्याने हात नाही लाववत !” दादू बोलला.
“परंतु हिंदूच्या पोरीच्या अंगाला हात लावाल, गायीवर सुरा चालवाल-” हरदयाळ खोचून म्हणाले.
“गायी तुम्हीच विकल्या नाहीत तर कोण मारणार आहे ? तुम्ही गायीला माता म्हणता, परंतु त्या मातेला विकता ! गायीला माता म्हणता, मात्र दूध म्हशीचे पिता ! माता म्हणून मातेला लाथा मारणारे-दांभिक आहा तुम्ही हिंदू ! सा-या विश्वावर प्रेम करायची तुमची ऐट, परंतु प्रत्यक्ष पाहू गेले तर तुमचे प्रेम कोठेच नसते. प्रेमाचा पहिला धडा तरी आम्ही शिकलो आहो. मूलबाळ-सारे मुसलमान भाई, यांना तरी आम्ही विसरत नाही. हरदयाळ ! राग नका मानू. परंतु स्वतःचे घर आधी नीट सुधारा. दंभ दूर ठेवा. आमच्या मुसलमानांत वाईट लोक आहेत आणि त्याबद्दल माझी मान खाली आहे; परंतु ‘मुसंडे मुसंडे’ हे शब्द मला सुरीप्रमाणे झोंबले. जाऊ दे. मी आता जातो. हिंदूंसाठी मरण्याची संधी मिळाली, तर ती मी आधी पत्करीन, हेच रात्रंदिवस माझ्या मनात येत असते.” दादू उत्कटतेने बोलला.
“शश्या, यांच्याकडे खाल्लेबिल्लेस का नाही ? त्यांनी दिले असेल मुद्दाम खायला ! बाटवाबाटवी यांना पाहिजेच ! बोलत का नाहीस ?” हरदयाळ शशीकडे रागाने बघत म्हणाले.
“दादू म्हणाला, “हरदयाळ ! तुम्ही मुसलमानांजवळून फळफळावळ विकत घेता, हिंग विकत घेता तेव्हा नाही का बाटत ?”
“बाबा, मी अमीनकडे फक्त दोन आंबे खाल्ले. आंबा नाही का चालणार ?” शशीने विचारले.
“हरदयाळ ! आम्ही का तुमच्या पोराला मांसमच्छर देऊ ? काय हे तुमचे मन !” दादू खिन्नतेने म्हणाला.