मोलकरीण 10
उन्हाळ्यामध्ये राधाबाईंनी काही आंब्याची व फणसांची साठी व काही गरे जमविले होते. एके दिवशी त्या गोविंदभटजींस म्हणाल्या, “आपल्या बाळाला हे पाठविता येतील का ? दुसरे तरी त्याला काय पाठवायचे ? हा कोकणचा मेवा पाठवावा.”
गोविंदभटजी म्हणाले, “त्या विलायतेत इतके लांब पार्सल जाईल तरी कसे ? वाटेतच सडून जाईल आणि साहेबांच्या देशात कोकणातील गरे का कोणी खाईल ? स्वर्गात अमृतच पितात, तेथे कांजीचे का भुरके मारायचे ? तुझ्या मुलाला हसतील सारे !”
राधाबाई म्हणाल्या, “तर मग नका पाठवू माझ्या बाळाला हसणार असतील तर कशाला पाठवा ? माझ्या बाळाला कोणी हसायला नको, त्याला कोणी नावे ठेवायला नको.”
एके दिवशी राधाबाईंना फार दुष्ट स्वप्न पडले. “बाळाला आपल्यापासून कोणी तरी ओढून नेत आहे.” असे ते स्वप्न होते. त्या एकदम ओरडल्या; गोविंदभटजी बाहेर ओसरीत निजले होते. त्यांनी हाक मारली.
“काय गं, भ्यालीस वाटते ? सावध झालीस का ?”
“काय बाई स्वप्न ! भारीच वाईट हो ! बाळ माझा सुखी राहो !” असे राधाबाई म्हणाल्या. दुस-या दिवशी पतीच्या पाठीस लागून त्यांनी दुष्टग्रहशमनार्थ शांत करविली.
एके दिवशी राधाबाई गोविंदभटजींस म्हणाल्या, “बाळाचे एकही पत्र का बरे येत नाही?”
गोविंदभटजी म्हणाले, “तू वेडी आहेस. अगं, तिकडून फक्त मोठमोठ्या साहेबांची पत्रे येतात. गरिबांची पत्रे कोण आणणार ? देवाला सर्वांची काळजी. आपण काळजी करून काय होणार ?”
मालतीला पत्रे येत होती. गुलाबी लिफाफे, सुंदर भावनोत्कट प्रेममय विचार, गोड भाषा, सुंदर शाई, सुंदर कागदावर लिहिलेले ! मालतीला तिच्या साहेबांची पत्रे येत होती, परंतु बाळाची पत्रे राधाबाईंना मात्र मिळत नव्हती !
बाळ आय्. सी. एस्. होऊन आला व व-हाडात कलेक्टर झाला. बाळाचा मालतीशी विवाह झाला. नव्या पद्धतीचा तो विवाह होता. येथे देवदेवकाची जरूर नव्हती. मित्रांना थाटाची मेजवानी झाली, हारतुरे झाले, फोटो निघाले, ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले, बाळाचे बाळासाहेब झाले व मालती बाईसाहेब झाली.
उमरावतीला सरकारी बंगल्यात बाळ राहत होता. तरी गडी माणसे होती, शिपाई होते. बाळासाहेबांचा थाट काय विचारता ? ते आधीच गोरगोमटे होते, त्यात विलायतेहून आलेले. ते अगदी गोरेपान दिसत ! अधिकाराचे तेज त्यांच्या मुखावर तळपे. ते नेहमी साहेबी पद्धतीनेच राहात. घरात इंग्लंड येऊन बसले ! दिवाणखान्यात खुर्च्या, मेजे, पडदे, पंखे, रुमाल, सारे अपटुडेट काम होते.