मोलकरीण 9
बाळ : तो बघ खळगा, पडत होतीस हो !
मालती : तुमचे लक्ष आहे की नाही ते मी पाहिले.
बाळ : या अंधारात हे रातकिडे कसे पण ओरडतात ! अंधार होताच यांची चिरचिर सुरू होते.
मालती : जशी अंथरुणावर सद्सद्विवेकबुद्धीची सुरू होते.
बाळ : आपली पहिली भेट तुला आठवते ?
मालती : मी सारे विसरेन, पण ती गोष्ट कशी विसरेन ? जीवनातील महान दालन उघडे करणारा तो प्रसंग, जीवनातील अज्ञात भाग प्रकट करणारा तो प्रसंग ! तो मी कसा विसरेन ?
बाळ : जाऊ दे ! त्या गोष्टी हृदयातील राहू देत. त्या शब्दात प्रकट करून त्यांचे पावित्र्य का घालवा? अंधारातून हळूच फुलणा-या उषःकालाकडे बघावे आणि डोळे मिटावे. हसावे, रडावे, गंभीर व्हावे, पावन व्हावे, विशाल व्हावे, उदार व्हावे, नाही का ?
मालती : प्रेम उदार करणारे न् विशाल करणारे असते.
बाळ : कधी कधी ते संकुचितही करते.
मालती : प्रेमाला कधी खोली असते, तर कधी विस्तार असतो.
बाळ : मनष्याचे प्रेम विहिरीप्रमाणे असते. क्वचित ते सरोवराप्रमाणेही आढळते. परंतु सागरासारखे अपरंपार प्रेम ! त्याचे दर्शन दु्र्मिळच होय.
मालती : परंतु त्या ध्येयाकडे आपण जाऊ.
बाळ : ते कठीण आहे. बोलण सोपे आहे.
मालती : प्रयत्न करू.
बाळ : पाहू काय होईल ते.
बाळाला निरोप देण्यासाठी बंदरावर किती तरी मित्रमंडळी आली होती. तेथे मालतीही होती. प्रेमगंधा, प्रेमरूपा मालती ! मोठ्या कष्टाने बाळ निघून गेला, बोट सुरू होणार; बाळ रुमाल हालवीत होता; मालतीनेही रुमाल हालविला. ती त्यांची हृदये हालत होती. लाटांवर बोट जरा हालत होती, मालती व बाळ यांची हृदये शततरंगावर डोलत होती. बाळाच्या डोळ्यांत पाणी आले व मालती वर बघण्याऐवजी खालच्या समुद्राकडेच पाहू लागली! गेली, बोट गेली!
अफाट समुद्रात बोट शिरली. बाळ अजून उभाच होता. मुंबई दिसेपर्यंत तो उभा होता. शेवटी तो आपल्या खोलीत गेला, त्याने गंभीरपणे आपली बॅग उघडली. आत मालतीचा फोटो होता, ती त्याची देवता होती, प्रेमरंगाने रंगलेली ती त्याची ध्येयमूर्ती होती. त्या फोटोकडे तो पाहात बसला. त्याची तृप्ती होईना.
बाळ जाणार म्हणून त्या दिवशी गोविंदभटजी देवावर अभिषेक करीत होते. घरी राधाबाई अश्रूंचा अभिषेक करीत होत्या. “अनंत समुद्रात बाळ असेल, वर आकाश, खाली पाणी ! बाळाला निरोपही देता आला नाही. अनेक कामांमुळे बाळाला घरी येता आले नाही. सरकारी स्कॉलरशिप-घरी येऊ दिले नसेल भेटायला. रडला असेल बाळ आमची आठवण येऊन. देवा ! सांभाळ हो त्याला तिकडे. साता समुद्रापलीकडे माझे लेकरू गेले आहे.” मुलाची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर शतवार येत होती.
बाळ विलायतेत झटून अभ्यास करीत होता. मालतीबरोबर विवाह करून केव्हा सुखसागरात पोहत राहू असे त्याला झाले होते. तो मालतीला वरचेवर पत्र पाठवी. सुंदर प्रेमळ पत्रे. त्याने मालतीला रमणीय देखाव्याचे फोटो पाठविले. स्वतःचाही एक गोड फोटो पाठविला. त्याची मालतीने अश्रूंनी पूजा केली.