शशी 35
शशी : बाबा, तुमची मांडी दुखू लागेल. माझे डोके खाली उशीवर ठेवा.
हरदयाळ : नाही रे बाळ, मुलाला मांडीवर घेतल्याने कधी मांडी का दुखते ? तेच तर आईबापांचे परम सुख, तोच त्यांचा मोक्ष !
शशी आपल्या घरात लहानशा खाटेवर पडला होता. त्याची ती आवडती तसबीर- ध्रुव-नारायणाची तसबीर- त्याच्याजवळ होती. ती तसबीर पांघरुणात हृदयाशी धरून तो पडला होता.
शशी : बाबा, अमीनला बोलवा ना हो ! मला त्याला पहावेसे वाटते. भेटावेसे वाटते. किती दिवसांत अमीन दिसला नाही.
हरदयाळ : तू आधी जरा बरा हो, मग भेटेल अमीन. स्वस्थ पडून रहा. बाहेर पाऊस पडू लागला. पावसाचा टपटप आवाज होत होता.
शशी : बाबा, आज आकाश का रडत आहे ? मागे एकदा केव्हा तरी तुम्ही मला मारले होते, त्या दिवशी असेच रडत होते, तुम्ही तर आज मला मारले नाही. दुस-या कोणा मुलाला आईबापांनी मारले असेल. हो ना, बाबा ?
हरदयाळ : शशी, बाळ, बोलू नकोस. तुला त्रास होईल. अगदी शांत पडून राहा.
हरदयाळ औषध आणण्यासाठी बाहेर गेले होते. शशीची आई त्याच्याजवळ बसली होती. तिकडे पाळण्यात मधू रडू लागला होता. शशी म्हणाला, “आई, तू मधूला आंदूळ जा. तो बघ, रडत आहे. त्याला ओव्या म्हण. मला त्या आवडतात.” रडणा-या मधूकडे पार्वतीबाई गेल्या व ओव्या म्हणू लागल्या:
गायी न चरती। कोवळी ग पाने
पावा जनार्दने। वाजवीला।। अंगाई
गायी ग चरती। कोवळी कणीसे
बाळाला नीरसे। दूध पाजू।। अंगाई
मोराचो मुकुट। ओठी धरी पावा
गोपाळकृष्ण गावा। गोकुळीचा।। अंगाई
गळा वनमाळ। घोंगडी ती खांदी
स्मरू कान्हा आधी। गोकुळीचा।। अंगाई
गोड काला करी। यमुनेच्या तटी
वनमाळा कंठी। कृष्णाजीच्या।। अंगाई