Get it on Google Play
Download on the App Store

मोलकरीण 20

इजिप्तमध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. त्याचे परिणाम काय होतील याबद्दल एक इंग्रजी अधिकारी काय म्हणाला ते त्यात आहेः ‘There will be then a race of brown Englishmen.” ‘इजिप्शियन लोक हे; मग पिंगट रंगाचे इंग्रजच होऊन जातील.’ मालती! आपणही तसेच शिकलेले इंग्रज झालो आहो, रंगाने मात्र काळेसावले आहो आणि दर्जाने गुलाम आहो- एवढाच काय तो फरक. बाकी आपण साहेबच! त्यांचा पेहरा, उठल्याबसल्या त्यांची बोली, त्यांचे खेळ, त्यांची वर्तमानपत्रे, त्यांची पुस्तके, त्यांचे खाणपिणे, सारे त्यांचे! मग आपणास आपल्या इतर बांधवांचा विसर पडतो. सूटबूट वापरणारे आपण बाराबंदी घालणा-यास तुच्छ मानतो. मालती, आंधळे ग आंधळे! मी आंधळा आणि तूही आंधळी! ‘त्या राजापुरी भटजीकडे मला नका हो नेऊ!’ असे तू म्हणत असस आणि तुझा गुलाम होऊन मी ते कबूल करीत असे. माझ्या आई-बापांस मी भेटलो नाही, त्यांना कधी नीट पत्र लिहिले नाही. मी कृतघ्न आहे-विद्यांध, सत्तांध, प्रेमांध, मदांध असा आहे! आपण दोघेही कर्तव्यच्युत झालो! आपण परस्परांस जागृती दिली नाही, अधोधो वाहातच गेलो. मालती, आता मी रडू नको तर काय करू! हेच दुःख मला अलीकडे शल्याप्रमाणे टोचीत आहे. मला खाणेपिणे गोड लागत नाही. झोप येत नाही. मालती, कोठे आहेत माझे आईबाप, कोठे आहेत ती दोन पिकली पाने! तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी मला वाढविले, माझे लालन-पालन केले. कोठे आहेत ते! कोठे आहेत तुझे प्रेमळ सासू-सासरे, नरेश-दिनेशांचे आजी-आजोबा! त्यांना केवढे कौतुक वाटले असते, केवढे समाधान वाटले असते!”

आपण त्यांना पुनः आणू. त्यांच्या पाया पडून त्यांना आणू. नका असे रडू अन् मलाही नका रडवू. होय, तुम्हाला अंध करणारी पापिणी मीच होय! तुमचे शब्द ऐकून माझे हृदय फाटले आहे, माझा कंठ दाटला आहे. मी काय सांगू! काय बोलू! माझाच अपराध. मी खरोखर दोषी; परंतु आपण त्यांना त्रिभुवन धुंडाळून आणू, त्यांची सेवाचाकरी करू.” मालती गहिवरून बोलली.

“आता कोठून आणणार त्यांना! माझे थोर, कष्टाळू, प्रेमळ बाबा! मालती, गेले हो, ते मला सोडून गेले. ते देवाकडे गेले. ते अपमानाच्या दुःखाने मरण पावले. कृतघ्नतेसारखी तीक्ष्ण सुरी नाही. जगातील इतर अपमान बाबांनी गिळले. परंतु ज्याच्यासाठी सारे अपमान त्यांनी गिळले त्यानेच जेव्हा त्यांना घालविले, त्या वेळेस ते कसे जगणार? ते कसे सहन करणार! ती प्रखर घोर निराशा त्यांना कशी सहन झाली असेल! दुःखाने जळून, होरपळून गेले माझे बाबा! उन्हातान्हात हिंडून हिंडून आधीच करपून गेलेली, शिणून गेलेली त्यांची काया त्या अपमानवन्हीने क्षणात भस्म झाली असेल! मालती, तुझा पती पितृहत्यारी आहे! अरेरे! काय केले मी... !”

“पण असतील हो ते कोठे तरी. मामंजी असतील, ते मुलावर रागावणार नाहीत. प्रेम का कधी रागावते! असतील, ते तुम्हाला वा-याबरोबर आशीर्वाद पाठवीत असतील. आपण त्यांना आणू, अश्रूंनी त्यांचे पाय धुऊ, दोघेजण त्यांचे पाय चेपू, त्यांच्याजवळ क्षमा मागू. क्षमा न मागताही प्रेम क्षमा करीत असते. ते प्रेमळ जीव आपणावर रागावणार नाहीत. तुम्ही उगाच मनात अशुभ का आणता! ते कोकणात असतील येता तिकडे!” मालतीने केविलवाणे विचारले.

“मालती, बाबा मला कायमचे अंतरले यात तिळभरही शंका नाही. ते माझे कल्याण अन् मंगलच चिंतीत गेले असतील, परंतु यांच्या हृदयाला धक्का सहन झाला नाही हे खरे. बाबा गेले! आई कोठे असेल? आई!” बाळासाहेब रडू लागले.

विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29