विश्राम 10
विश्राम : तुम्ही असे बोलून नका आम्हाला हिणवू. ज्याने त्याने आपापल्या पायरीने राहावे. पायातली वहाण पायातच हवी.
दिनकरराव : होय, मी तरी तेच म्हणतो आहे. ज्याचे त्याचे खरे मोल ठरले पाहिजे. तुमचे मोल सर्वांत थोर. आम्ही सर्वात नीच. आयतोबा! विश्राम, तू त्या दिवशी माझ्या पायातून सापाचेच विष नाही फक्त चोखून घेतलेस, तर माझ्या स्वार्थाचे, माझ्या अनुदारतेचे, माझ्या खोट्या अहंमन्यतेचे, जीवनात भिनलेले सारे विष-सारे तू ओढून घेतलेस. विश्राम, मी पूर्वी विषारी साप होतो. तू मला निर्विष केले आहेस. मला प्राणच परत दिले नाहीस, तर निर्मळ दृष्टीसुद्धा दिलीस. तू माझा उद्धार केलास. विश्राम, तुझे मजवर अनंत उपकार आहेत. माझी सारी गायीगुरे तुझी आहेत. तू नाही का परत त्यांची निगा राखणार?
म्हातारा : तुमच्याकडे परत विश्राम येत जाईल कामाला.
सगुणा : परंतु तुमच्याकडचे दूध वगैरे काही नको आम्हाला!
म्हातारा : पोरी, असे बोलू नये.
दिनकरराव : आता ते दूध माझे नाही, ते तुमचेच आहे. तुम्ही मला द्याल तरच मी घेणार!
विश्राम : मी येईन कामावर.
दिनकरराव : तू आमच्या घरातल्यासारखा वाग. आम्ही तुला घरातलाच मानू. नाही तर एक गाय तुझ्याकडेच घेऊन ये, म्हणजे सगुणेला संकोच वाटणार नाही. विश्राम, खरोखरच आजपासून मी निराळा झालो आहे. माझा आज पुनरुद्धार झाला, मला नवजीवन मिळाले.
विश्राम : सारी देवाची कृपा!
दिनकरराव निघून गेले. विश्राम परत कामावर जाऊ लागला. दिनकररावांच्या घरची मंडळी विश्रामवर किती प्रेम करतात म्हणून सांगू! विश्राम साधाच आहे. श्रमावे, खपावे हेच त्याला माहीत. लोक म्हणतात, विश्रामवर देवाची कृपा नसेल, तर कोणावर असेल?