श्यामची आत्या 5
थंडीचे दिवस आले म्हणजे सीताआत्या तरटे फाडून वासरांसाठी त्यांच्या झुली तयार करी. सीताआत्याला फार लांबवर जाववत नसे. तरी हिरवेगार टाळे आणून ते ती वासरांच्या समोर टांगी व त्यांना खायला शिकवी. जणू त्या चा-याने ती वासरांचे उष्टावणच करी. बाहेर सोडलेली गायवासरे तिन्हीसांजा होताच जर घरी आली नाहीत, तर सीताआत्याचे मन कावरेबावरे होई. ती बाहेर अंगणात येऊन, “मोत्या, चांद्या, यारे या; गावडी, ये गं ये.” अशा हाका मारी. गायवासरे एकदाची घरी आली म्हणजे सीताआत्याच्या जिवात जीव येई. मग ती सांजवत लावी आणि “दिव्या दिव्या दीपोत्कार. कानी कुंडले मोती हार. दिवा देखून नमस्कार” हे आणि “तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्हरात्र, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्यापाशी” वगैरे गाणी ती म्हणे. चुलीतील थोडी रक्षा आणून ती अंगारा म्हणून वासरांना लावी.
मनुष्याचे मन हे जात्या प्रेमळ आहे. ईश्वराने प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयात भरपूर प्रेम कोणाला तरी द्यावे असे माणसाला वाटत असते. हे भरलेले प्रेम पिऊन टाकणारा कोणीतरी पाडस प्रत्येकाला पाहिजे असतो. भरलेल्या स्तनाची गाय असावी व तिच्या जवळ तिची कास रिकामी करणारा पाडस नसावा; मग ती कोणाला दूध पाजणार? तिच्या स्तनांना गळती लागते, कळा लागतात! त्या स्तनाशी झगडताना प्रेमळ पाडस तिला पाहिजे असतो. त्याच्यासाठी ती हंबरत असते.
आपण सारे या जगात हंबरत असतो. आपण आपल्या कक्षेत येणा-या प्रत्येकाला जणू हुंगून पाहतो! “हाच का आपल्या हृदयातला प्रेमामृत पान करणारा पाडस?” असे आपण विचारतो. असा पाडस सापडेपर्यंत आपणास चैन पडत नसते. अपत्यहीन गतभर्तृका परमेश्वराला मूल मानून त्याची पूजा करते. त्या लंगड्या बाळकृष्णाच्या अंगावर बाळलेणे घालते. मनातील वात्सल्यप्रेम आपण जेथे व्यक्त करू, ती वस्तू वा ती व्यक्ती मिळेपर्यंत आपला जीव घुटमळत राहतो, असंतुष्ट राहतो.
बायकांना काय व पुरुषांना काय, अपत्य हवे असते ते मनातील या निर्मळ व वत्सल प्रेमवृत्तीच्या समाधानासाठी. कोणाला जवळ घेऊ, कोणाला आंगडे-टोपडे लेववू, असे स्त्री-पुरुषांना वाटत असते. जगात कोणाचे तरी आईबाप होण्यात धन्यता आहे. आईबाप मुलांवर सर्वस्वाची पाखर घालतात. ज्यांना मूलबाळ नाही, त्यांना दुस-यांची मुले जवळ घ्यावी, त्यांना खाऊ द्यावा, त्यांना खेळणे द्यावे, त्यांच्याशी हसावे बोलावे, असे वाटत असते. सारांश, मनुष्यप्राण्याला आपल्या हृदयातील ती वात्सल्यता प्रकट करण्यासाठी काहीतरी प्रत्यक्ष वा मूर्तीमंत पाहिजे असते.
सीताआत्याला मूलबाळ नव्हते; परंतु आता तिचे सारे अपत्यप्रेम गायीच्या वासरांवर बसले होते. ती वासरेच तिची साजिरी गोजिरी मुले झाली. तिच्या आयुष्यातील एक उणीव भरून निघाली. प्रेमपूर वाहू लागला. प्रेम देण्यास वस्तू मिळाली. सीताआत्याला आता आयुष्याचा कंटाळा येत नसे. संसार निःसार वाटत नसे. “मी मेले तर या वासरांना कोण सांभाळील, यांना चारा कोण देईल, पाणी कोण दाखवील ?” असे तिच्या मनात य़ेई. “हे सारे आता मलाच केले पाहिजे,” असे ती म्हणे.