मोलकरीण 11
घरात स्वयंपाकीणबाई होती. बाईसाहेबांस काम असे काहीच नसे. परंतु कंटाळा येऊ नये म्हणून त्यांचा सुसंस्कृत मेंदू कार्यक्रम शोधीत असे. सकाळी पतीबरोबर त्याही टेनिस खेळावयास जात, दुपारी फोनो लावीत. रेडिओ होताच. कधी त्या एखादा रुमाल विणीत. कधी मैत्रिणींना पत्रे लिहिण्याचे काम असे. खाण्याचे नवीन नवीन पदार्थ काय करावयाचे, ते हुडकण्यातही बराच वेळ जाई. त्या कुत्र्याजवळ खेळत व त्याचे पापे घेत. साय़ंकाळी त्या मोटारीतून फिरावयास जात. अशा प्रकारे वेळ जात होता.मानवी आयुष्य सार्थकी लागत होते !
बाळ विलायतेहून आला. परंतु भेटावयास घरी गेला नाही. “सरकारी काम ! लगेच नेमले असेल त्याला, इकडे येऊही दिले नसेल, काय करील बिचारा ! आमच्या भेटीसाठी तळमळत असेल हो पोर तिकडे !” असे राधाबाई म्हणत.
गोविंदभटजी म्हणत, “तिकडे खुशाल आहे ना ? ठीक आहे. अगं, नोकरी म्हणजे ही अशीच सुळावरची पोळी ! नोकरीपुढे-आईबाप, देवधर्म काही नाही ! देवासाठी आईबाप सोडावे लागतात, तद्वत नोकरी करणा-यांसही आईबापांचा मोह सोडावा लागतो !”
राधाबाई म्हणाल्या, “एकदा सूनबाईला पाहिले असते, अंबाबाईची ओटी तिच्या हातून भरविली असती. बोडण भरले असते; परंतु काय करणार ? सोन्यासारखी सून आहे म्हणतात. परंतु सूनमुख पाहण्याचे माझ्या नशिबीच नसेल ! नसेल का हो त्याला रजा मिळत ?”
गोविंदभटजी म्हणाले, “आता ते सरकारचे गुलाम ! काय करतील ? वरचा साहेब नसेलही कदाचित येऊ देत.”
गोविंदभटजी दिवसेंदिवस थकत चालले, यंत्र किती दिवस चालणार ? रहाटाच्या लोट्या किती दिवस फिरणार व टिकणार ? त्यांनी जन्मभर पायांनी वणवण केली. आता त्यांच्यात त्राण नव्हते. तरी अजूनही ते अंगणाची झाडलोट करीत. ते एखादे वेळेस राधाबाईस म्हणत, “मी काही आता फार दिवस नाही हो वाचणार ! आणि वाचून तरी काय करायचे आहे ? सारे सोहाळे झाले. देवाने आता डोळे मिटावे म्हणजे झाले !”
राधाबाई म्हणायच्या, “पण एकदा बाळाला पाहून येऊ आपण. येता का ? बाळाला केव्हा पाहीन असे मला झाले आहे.”
गोविंदभटजी विरक्तपणे म्हणत, “अगं, कोठे जायचे आता या म्हातारपणी ? माझ्याने नाही हो आता ही यातायात होत. आगगाडी नि आगबोट; एक का त्रास ? ती प्रवासाची दगदग माझ्याने होणार नाही; आणि जवळ का जायचे आहे ? तिकडे व-हाड-खानदेशात जावयाचे ! येथेच आता शांतपणे डोळे मिटू देत. मला कसलीही इच्छा नाही.”
तिकडे बाळासाहेबास मुलगा झाला होता. मुलाचे कौतुक करण्यास मालतीचा सगळा वेळ जाई. मुलाचे किती कपडे, त्याची किती खेळणी ! मुलाला फिरावयास नेण्यासाठी हातगाडी, ती गाडी ढकलावयास एक बाई आणि त्या मुलाचे किती फोटो ! कुत्र्याजवळ बसलेला, आईच्या मांडीवर अंघोळ करताना उघडा बसलेला. फोटोच फोटो ! हौसेला मोल नाही, पैसे असले व रिकामपण असले म्हणजे हा कलाविलास सुचत असतो !